|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राथमिक शिक्षक समिती राज्य महाअधिवेशन 2 पासून

प्राथमिक शिक्षक समिती राज्य महाअधिवेशन 2 पासून 

प्रतिनिधी /ओरोस:

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 16 वे त्रैवार्षिक महाअधिवेशन 2 ते 4 जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्यभरातून दीड लाख शिक्षक दाखल होणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली असून शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार आणि शिक्षण संचालक सुनील चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पुढील तीन वर्षांसाठीची राज्य कार्यकारिणीही निवडली जाणार आहे.

 अंशदान पेन्शन योजना रद्द करावी, अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, शालेय पोषण आहार ऑनलाईन कामे यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, सर्व मुलांना मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात यावे, उपस्थिती भत्ता प्रति विद्यार्थिनी दहा रुपये करण्यात यावा, त्रीस्तरीय वेतनश्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, सर्व शाळांना मोफत वीज, पाणी व डिजिटल क्लासरुम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पूर्वलक्षी प्रभावाने सादिल अनुदान देण्यात यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य 30 अशा एकूण 40 मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, जि. प. अध्यक्ष, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आदी उपस्थित राहणार आहेत.

स्मरणिका प्रकाशित करणार

संघटनेच्या मागील 56 वर्षांच्या वाटचालीची स्मरणिकाही यावेळी प्रकाशित केली जाणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शैक्षणिक लेख, उपक्रम, शाळांची माहिती, नवीन शैक्षणिक विचार, डिजिटल शाळा आणि जिल्हय़ाची पर्यटनदृष्टय़ा ओळख आणि वैशिष्टय़े, शिक्षक कवींच्या कविता आदींचा समावेश राहणार आहे. यावेळी राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, सचिव चंद्रसेन पाताडे, कोकण विभाग प्रमुख नामदेव जांभवडेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, गिल्बर्ट फर्नांडिस महेंद्र पवार, मंगेश राणे, किरण कोरगावकर आदी उपस्थित होते.