|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एसटीवर आता स्वच्छतेचा बोजा

एसटीवर आता स्वच्छतेचा बोजा 

साडेचारशे कोटींचे नवे कंत्राट,

कुरिअर सेवाही चालवणार

राजगोपाल मयेकर /दापोली

राज्यात एसटी महामंडळातर्फे जुनी कंत्राटे रद्द करण्याबरोबर नवनवीन कंत्राटे लागू करण्याचे धोरण सुरूच असून यामध्ये आता स्वच्छता आणि कुरिअर सेवांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यातील स्वच्छता कंत्राटात कोटय़वधींचा नवा बोजा महामंडळावर पडणार आहे. त्याचबरोबर खासगी कंपनीचे कुरिअर कंत्राट रद्द करून आता ही सेवाही महामंडळ चालवणार असल्याने कर्मचाऱयांवर अतिरिक्त ताण येणार आहे.

ऑक्टोबरमध्ये ब्रिग्झ कंपनीला राज्यातील सर्व आगारांच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा स्तरावरील स्थानिक बेरोजगार, मजूर सहकारी संस्थांकडून या कंत्राटासाठी निविदा मागवल्या जात होत्या. त्यातही या कंत्राटाची रक्कम गुणानुसार अदा करण्याचा निकष ठेवण्यात आला होता. यामध्ये आगार परिसरातील स्वच्छतेच्या विविध कामांसाठी वेगवेगळे गुण ठरवण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱयांकडून आगारातील गुण निश्चित करण्यात आल्यानंतर संबंधित संस्थांना रक्कम अदा होत असे. त्यामुळे रत्नागिरीसारख्या एका जिह्यात एसटीच्या स्वच्छतेवरील खर्च दरमहिना अडीच ते तीन लाखापर्यंत मर्यादित राहायचा. पण आता नवीन राज्यस्तरीय कंत्राटानुसार एवढा खर्च एका आगारावरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील एसटीच्या स्वच्छतेसाठी 445 कोटी रूपयांचे हे कंत्राट असून या वर्षाअखेरपर्यंत याची अंमलबजाववणी सर्व आगारात होणार आहे. सध्या अनेक आगारांमध्ये संबंधित कंपनीकडून स्वच्छता कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आल्याने वर्षोनुवर्षे काम करणारे जुने कर्मचारी अपात्र ठरले आहेत. त्याचा मोठा फटका या जुन्या कंत्राटी कर्मचाऱयांना बसला असून या कर्मचाऱयांवर अचानक बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. विशेष म्हणजे नवीन कंत्राटी कर्मचाऱयांना कंपनीकडून महिना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.

दरम्यान, एसटीमार्फत कुरिअर सेवा देणाऱया अंकल कंपनीचे कंत्राटही नियम उल्लंघन केल्याचे कारण सांगून रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 18 डिसेंबरपासून हे कंत्राट रद्द झाले असून या तारखेपर्यंत आलेले पार्सल 22 तारखेपर्यंत संबंधित ठिकाणी पोच करण्याची मुदत अंकल कुरिअरला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कुरिअर सेवा आता एसटी महामंडळाकडूनच चालवण्यात येणार आहे. गेली पंधरा वर्षे खासगी कंपन्यांमार्फत ही सेवा देण्यात येत होती. मात्र आता अपुऱया कर्मचाऱयांच्या समस्येने ग्रासलेले एसटी महामंडळ या कुरिअर सेवेसाठी कर्मचाऱयांची कशी व्यवस्था करणार, हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱयांना पडला आहे. मात्र नवनवीन कंत्राट करून एसटीला आर्थिक ओझ्याखाली आणणाऱया या निर्णयामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर पुन्हा एसटी वर्तुळात टीकेची झोड उठली आहे.