|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » रणजीत विदर्भाची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक

रणजीत विदर्भाची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या विदर्भ संघाने यंदा कमाल केली आहे. रणजी चषकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

रणजी करंडकाच्या या हंगामात विदर्भाच्या संघाने बडय़ा संघांना पराभवाचा धक्का दिला होता. उपांत्य सामन्यात फैज फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया विदर्भाच्या संघाची सुरुवात मात्र चांगलीच अडखळती झालेली होती. अभिमन्यू मिथुन, विनय कुमार आणि श्रीनाथ अरविंद यांच्या माऱयासमोर विदर्भाचा संघ 185 धावांमध्ये सर्वबाद झाला. पहिल्या डावात आदित्य सरवटेच्या 47 आणि अनुभवी वासिम जाफरच्या 39 धावांच्या जोरावर विदर्भाने 185 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने विदर्भाचा निम्मा संघ गारद केला.

विदर्भाने विजयासाठी दिलेले आव्हान कर्नाटकचा संघ सहज पार करेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र रजनीश गुरबानीने दुसऱया डावात कर्नाटकच्या 7 फलंदाजांना माघारी धाडत कर्नाटकच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. सामन्याच्या शेवटच्या दिवशी कर्नाटकला विजयासाठी अवघ्या 30 धावांची गरज होती. कर्णधार विनय कुमार, श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुन यांनी झुंज देत विजयाचं पारडं आपल्याबाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र रजनीश गुरबानीने त्यांचे मनसुबे उधळून लावले. श्रीनाथ अरविंदला अपुर्व वानखेडेकडे झेल द्यायला भाग पाडत विदर्भाने अखेर या सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला. विदर्भ विरुद्ध दिल्ली यांच्यातला अंतिम सामना 29 डिसेंबर ते 2 जानेवारी इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार आहे.