|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कळंगूटमध्ये 2 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांना बंदी

कळंगूटमध्ये 2 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांना बंदी 

प्रतिनिधी /म्हापसा :

कळंगूट पंचायत मंडळ व ट्राफीक पोलीस यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी कळंगूट येथे झाली. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पर्यटकांची होणाऱया सांभाव्य गर्दीचा विचार करून या दहा दिवसात वाहतूक व्यवस्था बिघडू नये यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले. या कालावधीत बाहेरून येणाऱया अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून 700 पोलीस व 5 पोलीस निरीक्षकांची नियुक्ती कळंगूटसाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती कळंगूटचे वाहतूक निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी दिली. 

कळंगूटचे सरपंच ऍन्थोनी मिनेझिस यावेळी बोलताना म्हणाले की, नाताळ व नववर्षांचे औचित्य साधून कळंगूट येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. या कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ही चौथी बैठक घेण्यात आली. बैठकीत ठरल्याप्रमाणे कळंगूटमध्ये प्रवेश करण्यासाठी सहा एकेरी मार्ग तयार करण्यात आले आहेत. बाहेरून येणाऱया सर्व गाडय़ा सेंट ऍलेक्स चर्चजवळ पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. येथून एकूण 14 मिनीबस कळंगूट येथे पर्यटकांना नेण्यासाठी सज्ज असतील. सर्वत्र शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आही. खास शटल सर्व्हिसची सोय नागरिकांसाठी ठेवण्यात आली आहे.

पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी समीर गोवेकर, नीतेश चोडणकर, जॉन फर्नांडिस, माविन डिसोझा यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली जाईल. समीर गोवेकर यांनी सरपंचाशी सिक्युरिटी व्यवस्थेची मागणी केली. पंचायतीने लाईट व्यवस्था करावी. खास मोबाईल शौचालये व कचरा व्यवस्थापन करावे, अशीही मागणी केली. नीतेश चोडणकर यांनी साईनबोर्डची मागणी केली. शटल सर्व्हिस बसना क्रमांक द्यावेत अशीही मागणी केली.

म्हापसाहून कांदोळीमार्गे जाणाऱया बसेस थेट सोडण्यात येणार आहेत. खास इमरजन्सी रस्त्याचीही व्यवस्था केली आहे. आंतरराज्य बसेसना कळंगूटमध्ये प्रवेश करण्यासाठी 30 रुपये प्रति प्रवासी असे शुल्क आकारण्यात आले आहे. बेशिस्त वाहने व पार्किंगवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची एक व पंचायतीची एक क्रेन तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती चिमुलकर यांनी दिली. या बैठकीला उपसरपंच रुपा चोडणकर, पंचसदस्य पूजा मठकर, क्लेरा लोबा, जिल्हा पंचायत सदस्य शॉन माटिन्स, समीर गोवेकर, नीतेश चोडणकर, चानू चोडणकर आदी उपस्थित होते.

Related posts: