|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपुरात केवळ 899 हरकती दाखल

जयसिंगपुरात केवळ 899 हरकती दाखल 

प्रतिनिधी /जयसिंगपूर :

मिळकतधारकांना लागू केलेल्या करवाढप्रश्नी दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी बुधवारपासून पालिकेत सुरू झाली आहे. मात्र एकीकडे करात भरमसाठ वाढ लागू केल्याप्रश्नी या अन्यायी करवाढीच्या नोटीसा मागे द्याव्यात, यासाठी पालिकेला निवेदन देण्यात आले. तर दुसरीकडे 11 हजार 221 मिळकतधारकांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्यामुळे मिळकतधारकांच्या तुलनेत केवळ दहा टक्के हरकती दाखल झाल्याचे पुढे आले आहे.

शासनाच्या कायद्यानूसार दर चार वर्षांनी शहरातील मिळकतींवर करवाढ करण्यात येते. चालू आर्थिक वर्षांत शहरातील मिळकतधारकांवर करवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र शहरातील नागरिकांना विश्वासात घेवून करवाढीचा निर्णय द्यायला हवा होता. किमान लोकनियुक्त कौन्सिलला तरी याबाबत कळवायला हवे होते. पालिकेकडून आलेल्या करवाढीच्या नोटीसा पाहता 50 ते 100 टक्के करात वाढ झाली असून ही करवाढ अन्यायकारक आहे. असेसमेंट करताना मिळकतधारकांची संमती घ्यावी मगच कर आकरणी करावी., यासाठी शाहू आघाडीच्यावतीने पालिकेला निवेदन देण्यात आले होते. तर पालिकेने लागू केलेली करवाढ अन्यायकारक असून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी निवेदनाद्वारे पालिकेला दिला होता.

दरम्यान करवाढ प्रश्नी पालिकेने केलेल्या आवाहनानूसार शहरातील 11 हजार 221 पैकी केवळ 899 मिळकतधारकांनी हरकती दाखल केल्या आहेत. एकीकडे कुरूंदवाड शहरात करवाढीविरोधात शहर बंद ठेवून पालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी, नागरिकांचा प्रश्न घेवून पुढाकार घेतात. मात्र करवाढीप्रश्नी जयसिंगपुरातून हरकती दाखल करण्यासाठी मिळकतधारकांची मानसिकता नसल्याचे दिसून आले.

करवाढीवरून दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी बुधवारपासून येथील पालिकेच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 500 हरकतींवर सुनावणी प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारपर्यंत ही सुनावणी चालणार आहे.