|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव

‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव 

रौप्यमहोत्सवी सांगली आवृत्तीचा स्नेहमेळावा अपूर्व उत्साहात : सीमाबांधवांना महाराष्ट्राने सक्रिय साथ द्यावी

प्रतिनिधी/ सांगली

रम्य सायंकाळचा उत्साह, सनईची सुरेल साथ, आपुलकीने भारलेलं वातावरण, अनेक वर्षांचा जपलेला गोडवा आणि वाचक, हितचिंतक यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात ‘तरूण भारत’च्या सांगली आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन स्नेहमेळावा दणक्यात साजरा झाला. बापट बाल शिक्षण मंदिरच्या मैदानात अपूर्व उत्साहात झालेल्या कार्यक्रमात ‘तरूण भारत’चे समूह प्रमुख आणि मार्गदर्शक किरण ठाकुर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

‘तरूण भारत’ म्हणजे निर्भीडपणा, अन्यायावर प्रहार, सत्याची कास आणि समाजमूल्ये जपणारे वर्तमानपत्र असे जणू समीकरणच आहे. एखादी चळवळ त्यागातून अथवा व्रतासारखी जोपासावी ती ‘तरूण भारत’नेच. सीमालढय़ातील अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्याती आहेच. पण, अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची लेखणीची ताकदही ‘तरूण भारत’ बाळगून आहे. यासोबत ‘चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट’ म्हणण्याचा निडरपणाही ‘तरूण भारत’ने जपला आहे. यासह अनेक प्रतिक्रिया स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनुभवास आल्या. गेल्या 25 वर्षातील ‘तरूण भारत’ परिवाराच्या चांगल्या कार्याची जणू ही पोचपावतीच. चांदोली ते उमदी आणि कडेगाव ते म्हैसाळ अशा उभ्या-आडव्या पसरलेल्या सांगली जिल्हय़ातील वाचकांनी सहभाग नोंदवत स्नेहमेळाव्याचा आनंद व्दिगुणित केला.

स्नेहमेळाव्याचे उदघाटन दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. इस्लामपूरचे लोक नियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जतच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, चितळे उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक गौतम पवार, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार प्राची गोडबोले, मानसिंग बँकेचे प्रमुख जे.के.बापू जाधव, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांच्याहस्ते करण्यात आले.

 उद्घाटनप्रसंगी मोहनराव कदम म्हणाले, ‘तरूण भारत’ हे सांगली जिल्हय़ातील आघाडीचे दैनिक आहे. या दैनिकाने लोकांच्या मनात राज्य निर्माण केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, या दैनिकाने जनमानसात एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. सांगलीकरांच्या जीवनातील हा एक अविभाज्य घटक बनला आहे. तो लोकांना आपला मित्र वाटतो. इतकी त्याने आत्मियता निर्माण केली आहे. निशिकांत पाटील म्हणाले, लोकांच्या प्रश्नाला भिडणारे हे  दैनिक आहे. त्यांनी अनेक आव्हानात्मक कामे केली आहेत. या आव्हानात्मक कामात ‘तरूण भारत’ सातत्याने अग्रेसर आहे. गेल्या 25 वर्षात ‘तरूण भारत’ने वास्तववादी चित्रण केले आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, सीमाभागातील चळवळ जोमाने वाढविण्यासाठी सातत्याने ‘तरूण भारत’नेच प्रयत्न केला आहे. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार म्हणाल्या सामान्य कुटुंबातील स्त्राrला जतचे नगराध्यक्षपद मिळाले यामध्ये ‘तरूण भारत’चे योगदान आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नावर है दैनिक सातत्याने प्रहार करत आहे. त्यामुळे सामान्यांचे आशास्थान हे दैनिक आहे. नगरसेवक गौतम पवार म्हणाले, विविध विषयाच्या प्रश्नांचा ऊहापोह ‘तरूण भारत’मधून सातत्याने करण्यात येतो. गोव्यातील प्रश्न वेगळे, सिंधुदुर्गातील प्रश्न वेगळे, मुंबईतील प्रश्न वेगळे सांगलीतील वेगळे. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे मात्र ‘तरूण भारत’मधून मिळतात. त्यामुळे यांचे वेगळेपण दिसून येते.

 गिरीश चितळे म्हणाले, ‘तरूण भारत’ म्हणजे पुरवणीचा बादशहा आहे. सांगली जिल्हय़ात पुरवणी काढण्याचा हातखंडा फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच आहे. या पुरवण्या संग्रही ठेवण्यासारख्या आहेत. मानसिंग बँकेचे अध्यक्ष जे.के.बापू जाधव म्हणाले, ‘तरूण भारत’ने सीमालढा अत्यंत निष्ठेने दिला आहे. मराठी माणसांच्या अन्यायाविरोधात सातत्याने चळवळीची भूमिका घेतली आहे.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगलीत ‘तरूण भारत’ कसा रूजला आणि वाढला याची माहिती देताना जुन्या आठवणी सांगितल्या. हे सांगलीकरांचे मुखपत्र बनले आहे. रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होता आले, त्यात मी धन्यता मानतो, असे ते म्हणाले.

तरूण भारतचे समूह प्रमुख किरण ठाकुर म्हणाले, स्वातंत्र्यसेनानी बाबुराव ठाकुर यांनी ‘तरूण भारत’ची मुहूर्तमेढ रोवली आणि सामान्य लोकांसाठी लढण्याचा वसा दिला. हा वसा घेऊन 1919 पासून आम्ही लढत आहोत. सांगली आवृत्ती आज रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त सांगली आवृत्तीने तब्बल 116 पानांचे दैनिक काढून एक इतिहास केला आहे. एकाचवेळी 116 पानांचे दैनिक प्रसिद्ध करणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. ते सांगलीकरांनी करून दाखविले. ‘तरूण भारत’चे पत्रकार म्हणजे एक कार्यकर्ता असतो. कार्यकर्ता निष्ठेने कामकाज करत असतो आणि तेच काम सांगलीच्या सर्व कर्मचाऱयांनी करून दाखविले आहे. त्यामुळे मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

सांगलीकरांनी सीमालढय़ासाठी बळ द्यावे, सांगली हा बेळगावनजीकचा मराठी प्रदेश आहे. मराठी माणसांवर होणारा अन्याय सांगलीकरांनी जाणून घ्या आणि सीमाभागातील मराठी बांधवांना साथ द्या आणि हा सीमाप्रदेश महाराष्ट्रात यावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार उदासीन आहे. आजपर्यंत अनेक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो पण त्यांच्याकडून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी हालचाली झाल्या नाहीत. त्या यापुढील काळात व्हाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महापौर हारूण शिकलगार, खासदार संजयकाका पाटील, ‘तरूण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, सीईओ दीपक प्रभू, आमदार सुरेश खाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी महापौर किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवराज सातपुते, नगरसेवक शेखर माने, कवयित्री जयश्री पाटील, अरूण दांडेकर, वामन काळे, प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वागत आवृत्ती प्रमुख मंगेश मंत्री यांनी केले.

मंगेश मंत्री यांना गौरवपत्र प्रदान

सीमालढय़ाचा वसा जपत सांगलीत बेळगाव ‘तरुण भारत’ची आवृत्ती सुरू झाली. तो काळ आधी बुकिंग करून टेलिफोनवरून बोलण्याचा होता. प्रिंटींग यंत्रणाही फारशी अद्ययावत नव्हती. त्यावेळी सांगलीत ‘तरुण भारत’ची धुरा पत्रकार मंगेश मंत्री यांनी स्वीकारली. बेळगावच्या ‘तरुण भारत’ने सांगलीत ठसा उमटवला. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे पत्रकारिताही बदलत गेली. काळानुरूप ठामपणे बदल स्वीकारत पत्रकार मंत्री यांनी कामकाज सुरू ठेवले. गेल्या 25 वर्षात त्यांच्या हाताखाली अनेक पत्रकार, उपसंपादक, फोटोग्राफर आणि पर्यायाने एका पिढीची अख्खी पत्रकारिता घडली. अभ्यासू, संयमी आणि हसतमुख असलेल्या मंत्री यांनी वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीवर मायेने हात फिरवत कार्यरत राहण्याचे प्रोत्साहन दिले. आज ज्येष्ठ पत्रकार आणि सक्षम मार्गदर्शकाची भूमिका बजावताना मंत्री यांनी, ‘बदल स्वीकारा, पण जुनेही जपा’ असा कानमंत्र दिला. त्यांच्या या योगदानाबद्दल ‘तरुण भारत’ सांगली परिवाराकडून समूह प्रमुख किरण ठाकुर यांच्याहस्ते गौरवपत्र देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.