|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मृतदेहाची ओळख पटत नसल्याने तपास अडला

मृतदेहाची ओळख पटत नसल्याने तपास अडला 

प्रतिनिधी/ सांगे

कुयनामळ-सांगे येथे जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडण्याच्या घटनेस आता चार दिवस झाले असून तो मृतदेह बेपत्ता असलेल्या शांताराम शिरोडकर यांचा आहे की, नाही हे निश्चित होऊ न शकल्याने तपास अडला आहे. शिरोडकर यांच्या कुयनामळ येथील घरी भेट दिली असता त्यांचे कुटुंबीय अत्यंत तणावाखाली असल्याचे दिसून आले.

गेले चार दिवस शिरोडकर कुटुंबियांनी अत्यंत तणावाखाली काढले असून शांताराम यांच्या पत्नी आजारी पडल्याने त्यांना डॉक्टरकडे नेण्याची पाळी आली. एकंदर परिस्थिती पाहून सदर मृतदेह शांताराम यांचाच आहे की काय अशी शंका त्यांच्या कुटुंबियांनाही येऊ लागल्याचे दिसून येत आहे.

डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा

असे असले, तरी सदर मृतदेह शांताराम यांचा नसावा असा संशयही शिरोडकर कुटुंबियांना मोठय़ा प्रमाणात असून त्यांच्याकडून तशी भावना व्यक्त होताना दिसते. यामुळे सांगे पोलिसांनी ‘डीएनए’ चाचणी घेण्याचा निर्णय घेतला असून शांतराम यांची थोरली मुलगी व मधली मुलगी यांना पणजीत बोलावण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी सदर दोन्ही मुली पणजीला रवाना झाल्या.

डीएनए अहवालावर बरेच काही अवलंबून असून सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सदर मृतदेहाची नेमकी ओळख पटण्यास त्याची मदत होणार आहे. मृतदेह प्रचंड प्रमाणात जळालेला असल्याने तो ओळखण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे त्या मृतदेहाविषयी काहीही ठामपणे सांगणे पोलीस आणि शांताराम यांच्या कुटुंबियांनाही शक्य नाही. मात्र घटनास्थळी ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्या सगळय़ा शांताराम यांच्याच असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी मान्य केले आहे.

अहवालानंतर मिळेल गती

डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळेल असे दिसून येत आहे. आतापर्यंत पोलिसांना अनेक धागेदोरे प्राप्त झालेले आहेत, मात्र पुढे पाऊल टाकण्यासाठी मृतदेहाविषयी ठोस निष्कर्ष हाती येणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयितांची नावेही पोलिसांच्या हाती आहेत. पण मृतदेहाची ओळख सिद्ध झाल्याशिवाय काहीही कृती करणे पोलिसांना कठीण बनले आहे.

सफाईचा बेत रखडला आणि…

शांताराम शिरोडकर यांचे पुतणे महाबळेश्वर उर्फ बाबलो शिरोडकर यांनी या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असल्याचे सांगितले. असे काही विपरित घडेल याची कल्पना केली नव्हती. ही घटना उघडकीस आली त्याच्या आठ दिवस आधी आपण आणि शांताराम काका काजू बागायत स्वच्छ करून तिथे आग लावण्यासाठी जाणार होतो. पण बागायतीत जाण्याच्या गडबडीत असतानाच एक व्यक्ती टीव्ही दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे घेऊन आली. आपण टीव्ही मॅकेनिक असल्याने त्या दिवशी जाऊ शकलो नाही. नंतर या ना त्या कारणाने सदर काम तसेच राहून गेले, असे त्यांनी सांगितले.

कुटुंबावर भीतीचे सावट

23 रोजी काका एकटेच बागायतीत गेले आणि त्यानंतर ही भयंकर घटना घडली. या घटनेनंतर आता आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही धोका निर्माण झाला आहे. कारण काजूचा मोसम सुरू झाल्यानंतर काजू गोळा करण्यासाठी आम्ही सारे एकटेच बागायतीत जात असतो. आपली आई तर जास्त वेळ एकटीच काजू बागायतीत असते. अशा प्रकारचे हल्ले आमच्यावरही होऊ शकतात, अशा शब्दांत आपली भीती बाबलो शिरोडकर यांनी मांडली. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धोका असून पोलिसांनी याबाबतीत लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

रसायनाचा वापर ?

दरम्यान, ज्या परिस्थितीत सदर मृतदेह आढळून आला ते पाहिल्यास तो लवकर जळावा म्हणून त्यावर कसल्या तरी रसायनाचा उपयोग करण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर मृतदेह आवळून येऊन एखाद्या लहान मुलाच्या इतक्या आकाराचा झाला होता. जेथे मृतदेह सापडला त्या ठिकाणी खोदलेल्या चरात या संशयाला वाव देणारे काळे डाग आढळून आले आहेत.