|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » केळुसला आंबा बागेत अग्नितांडव

केळुसला आंबा बागेत अग्नितांडव 

50 एकरातील आंबा कलमे बेचिराख : 50 लाखाची हानी

वार्ताहर / वेंगुर्ले:

केळुस-सडा येथील प्रशांत कुंदनलाल चावला यांच्या 50 एकर क्षेत्रातील आंबा कलम बागेस आग लागून सुमारे 50 लाखाचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. आगीचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामस्थ तसेच आकाश फिश मिलच्या 80 कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.

आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या 2200 हापूस आंबा कलमांपैकी 750 कलमे या आगीत खाक झाली. बागेतील कामगारांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती बागेचे व्यवस्थापक अनिल नाईक यांना मोबाईलवरून दिली. चव्हाण हे तात्काळ कुडाळ नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबासोबत केळुसकडे निघाले असता हुमरमळा-आंदुर्ले येथे अग्निशमन बंबाच्या गाडीचे पाटे तुटल्याने गाडी तेथेच राहिली. त्यानंतर नाईक या आगीची कल्पना वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला दिली. या आगीची माहिती सडा येथील आकाश फिश मिलला समजताच आकाश फिशच्या व्यवस्थापनाने आपल्या पाणी टँकरसह 80 कामगारांना आग विझविण्यासाठी घटनास्थळी पाठविले. तब्बल 12 टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू होते. केळुस ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्याने वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंबास परत पाठविण्यात आले. मात्र, डोंगर उतार भागातील आग विझली नसल्याचे लक्षात येताच या अग्नीशमन बंबास पुन्हा पाचारण करण्यात आले. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

आग विझविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बी. जी. बाकरे, पोलीस उपनिरीक्षक कळसुलकर, पोलीस कर्मचारी ए. जी. घाटकर, के. आर. नाईक, कांबळी, खोत, पांचाळ, मंडळ अधिकारी राऊळ, तलाठी पी. एस. गवाणकर, सरपंच किशोर केळुसकर, उपसरपंच आबा खवणेकर, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग केळुसकर, माजी सरपंच योगेश शेटये, विनायक परब, बापू आसोलकर, भाई मोबारकर, उमेश मुणनकर, सुनील केळुसकर, राजा शेटय़े, बी. जी. शेळके, अशोक तुळसकर यांच्यासह आकाश फिश मिलचे कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

50 लाखाचे नुकसान

तब्बल सात तास आगीच्या भडक्यात सापडलेल्या केळुस-सडा येथील प्रशांत चावला यांच्या बागेतील सुमारे 750 कलमे आगीच्या भस्मस्थानी सापडली. अनेक कलमे होरपळली असून सुमारे 50 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बागेचे व्यवस्थापक नाईक यांनी वर्तविला आहे.