|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात पिण्यासाठी पाणी नसताना म्हादईचे पाणी का वळवितात

राज्यात पिण्यासाठी पाणी नसताना म्हादईचे पाणी का वळवितात 

प्रतिनिधी /मडगाव :

राज्यात 24 तास अखंडित पाणी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर करतात, पण 24 तास सोडाच दररोजचे पाणी व्यवस्थित मिळत नाही अशा पार्श्वभूमीवर म्हादईचे पाणी का वळविण्यात येते असा सवाल आमदार रवी नाईक यांनी काल मडगावात काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येडियुराप्पाना पत्र लिहून पीण्यासाठी पाणी पुरविले जाणार असल्याचे कळवितात तर कालच जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर पाण्याचा एक थेंब सुद्धा कर्नाटकाला देणार नसल्याचे सांगतात, यावरून या सरकारात ताळतंत्र नाही का ?, कोण सुप्रिम मुख्यमंत्री की मंत्री असा सवाल उपस्थित झाल्याचे रवी नाईक पुढे बोलताना म्हणाले.

दक्षिण गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनात पाच ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात फोंडा येथील बापतिस्त परेरा, खणगिणी-केपे येथील आगुस्तिनो कार्व्हालो, कुठ्ठाळी येथील माग्ना कुलासो, मडगाव येथील दामोदर बोरकर व कार्मिनो रोड्रिग्स यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, आमदार रवी नाईक, आमदार क्लाफास डायस, काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस गिरीष चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, दक्षिण गोवा प्रदेश काँग्रेसचे मावळते अध्यक्ष सुभाष फळदेसाई व नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो डायस इत्यादी मान्यवर उपस्थित होते.