|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विशी आनंद पुन्हा एकदा ‘रॅपिड’ किंग!,

विशी आनंद पुन्हा एकदा ‘रॅपिड’ किंग!, 

विश्व रॅपिड बुद्धिबळमध्ये चौदा वर्षांच्या खंडानंतर अजिंक्यपद

वृत्तसंस्था/ रियाध

माजी वर्ल्ड चॅम्पियन भारताच्या विश्वनाथन आनंदने चौदा वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा †िवश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकावले. येथे झालेल्या स्पर्धेत त्याने टायब्रेकरमध्ये रशियाच्या ब्लादिमिर फेडोसीव्हचा पराभव करून जेतेपद मिळविले. ‘वर्षभरात चांगली कामगिरी झाली नसली तरी या स्पर्धेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच उतरलो होतो. त्यामुळे स्वतःलाच आणि बुद्धिबळ जगताला चकित करण्यात यशस्वी ठरलो. दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनल्याचे खूप समाधान वाटते,’ अशा भावना आनंदने जेतेपदानंतर व्यक्त केल्या. त्याच्या या कामगिरी त्याचा माजी कट्टर प्रतिस्पर्धी गॅरी कॅस्पारोव्हने ट्विटच्या माध्यमातून आनंदचे कौतुक करताना त्याच्या टीकाकारांनाही कोपरखळी मारली आहे.

48 वर्षीय आनंदची अलीकडच्या काळातील सुमार कामगिरी पाहून काही जणांनी टीका केली आणि त्याने निवृत्त होण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. आनंदने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या कृतीनेच त्यांना चोख प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रॅपिड स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकावले. ‘मागील दोन रॅपिड स्पर्धा माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक ठरल्या होत्या. तरीही येथील स्पर्धेत मी आशावादी मानसिकतेने उतरलो होतो. पण माझ्यासाठी ही सर्वात चकित करणारी स्पर्धा ठरली. या स्पर्धेत माझे छान प्रदर्शन झाले,’ असे आनंद वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.

माजी वर्ल्ड चॅम्पियन आनंद या स्पर्धेत अपराजित राहिला आणि अखेरीस त्याने यश खेचून आणले. सर्व फेऱया पूर्ण झाल्यानंतर तीन खेळाडूंनी 15 पैकी 10.5 गुण मिळविल्याने त्यांच्यात टाय झाले होते. त्यामुळे आनंद व फेडोसीव्ह यांच्यात दोन डावांची टायब्रेक लढत झाली. त्यात आनंदने दोन्ही सामने जिंकून जेतेपदाचा करंडक पटकावला. ‘हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले. विशेषतः लंडनमधील बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा सर्वात निराशाजनक ठरली. या स्पर्धेबाबत मी फार मोठय़ा अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, तरीही चांगले प्रदर्शन करण्याची अपेक्षा होती. पण शेवटचा क्रमांक मिळणे हा माझ्यासाठी मोठाच धक्का होता,’ असे तो म्हणाला.

‘येथील स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच चमकदार खेळ झाला. रॅपिड बुद्धिबळ स्पर्धांत वर्चस्व गाजविलेल्या दिवसांची आठवण आणि काळ माझ्यासाठी थांबलाय असेच वाटले. यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला. यावर कडी म्हणजे पीटर लेकोवरील विजय. ही खूप छान लढत झाली होती. त्यामुळे मानसिकतेतही सकारात्मक बदल झाला.’ असे सांगत त्याने वर्ल्ड चॅम्पियन नॉर्वेच्या कार्लसनवरील विजय हा या स्पर्धेतील निर्णायक क्षण ठरल्याचे सांगितले. ‘कार्लसनवरील विजय माझ्यासाठी निर्णायक क्षण होता. कारण आधीच्या फेरीत तो बु झियांगझीकडून तो पराभूत झाला होता. तरीही तो नेहमीप्रमाणे उत्तम फॉर्ममध्ये होता. त्याच्याकडे मागणीप्रमाणे  विजय मिळविण्याची आश्चर्यकारक क्षमता असल्याने शेवटच्या काही फेऱयांत तोच फेव्हरिट असल्याचे मला वाटत होते. आमची लढत खूपच अटीतटीची झाली. निम्झो इंडियनच्या या डावात ब्लिट्झ व रॅपिड प्रकारात पूर्ण वर्चस्व राखणाऱया खेळाडूला हरविल्याने खूप समाधान वाटले. आम्हा दोघांतील लढतींचा इतिहास व अटीतटीच्या सामन्यांचा विचार करता कार्लसनवरील विजयाचे जरा जास्तच समाधान वाटले,’ असेही त्याने सांगितले.

स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात आपल्याला पदक मिळणार का, याबाबत चिंता वाटल्याचे तो म्हणाला. पण शेवटच्या दिवशीच्या विविध सामन्यांतील अनपेक्षित निकालामुळे आनंदला सुवर्णपदकाची संधी मिळाली आणि ती त्याने अचूक साधली. ‘या स्पर्धेतील जेतेपद अनपेक्षितच म्हणायला हवे. कारण या स्पर्धेची घोषणा उशिरा झाल्याने मी त्यात भाग घेणार नव्हतो. मात्र सर्वात आनंद देणारी भावना म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान पुन्हा मिळणे. मी इतका खुश आहे की त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही,’ अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.

जुन्या कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून आनंदचे कौतुक

रॅपिड स्पर्धेचे विश्व अजिंक्मयपद मिळविल्यानंतर त्याचा माजी कडवा प्रतिस्पर्धी गॅरी कॅस्पारोव्हने आनंदचे मनापासून अभिनंदन केले. ट्विटच्या माध्यमातून त्याने बोलकी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘तू केव्हा निवृत्त होणार, असे विचारणाऱया टीकाकारांना तू हे जेतेपद समर्पित करशील, अशी मी आशा करतो.’