|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयातील उड्डाणपुल ठरणार जीवघेणे

साताऱयातील उड्डाणपुल ठरणार जीवघेणे 

डॅनिअल खुडे/ सातारा

स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिशांनी बांधलेले पुल आजही साताऱयात भक्कमपणे उभे असल्याचे दिसते. परंतु आधुनिक नवीन तंत्रज्ञान येऊनही अवघ्या दोन महिन्यांपुर्वी बांधलेले महामार्गावरील पुल भ्रष्टाचाराने पोखरल्यामुळे कधीही व केव्हाही ते ढासळतील अशी अवस्था निर्माण झाली आहे. यापुर्वी भुईंज व पाचवडच्या पुलांचे काम कोसळुन सातारकरांनी ट्रेलर पाहिला आहे. आता शिवराज चौकातील उड्डाणपुलाचे सिमेंट व माती ढासळु लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तरीही साताऱयातील कोणीही लोकप्रतिनिधी कंपन्यांना जाब विचारण्याचे धाडस करीत नाही हेच विशेष ..! महामार्गाच्या कामाचे पोस्टमार्टेम करणारा लेखाजोखा खास ‘तरुण भारत’मध्ये आजपासून देत आहोत.

देहुरोड ते शेंद्रे असे 140 किलोमीटर रस्त्याचे काम रिलायन्स कंपनीने ऑक्टोबर 2010 मध्ये सुरु केले ते अद्याप सुरुच आहे. रिलायन्स कंपनीने सबकॉन्ट्रक्ट नेमुन केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. शिवराज येथील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुलाची माती व सिमेंट ढासळु लागल्याने या पुलावरील वाहतूक दोन दिवस बंद करण्यात आली आहे. पण अधिकाऱयांनी निर्वाळा देत पूल  निर्धोक असल्याचे सांगून पुलावरील वाहतूक सुरू केली आहे. परंतु अजूनही वाहनधारकांच्या व प्रवाशांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षापासुन या पुलाचे काम करोडो रुपये खर्चुन सुरु होते. दिवाळीच्या आदल्या दिवशी दि. 16 ऑक्टोबरला हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अवघ्या दोन महिने 12 दिवसात या पुलाचे खच्चीकरण सुरु झाले आहे. मुळात जमिनीपासुन खाली सात फुट या पुलाचे आरीव्हॉल असणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात केवळ तीन फुट ऑरीव्हॉल जमिनीपासुन खाली घालून बांधकाम करण्यात आले आहे. पुणे ते सातारा हायवे प्रोजेक्टसाठी 1 हजार 610 कोटी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम करताना सुरुवातीला बेळगावच्या धर्तीवर सातारा बायपास पुल सलग करण्याचे ठरले होते. शिवराज ते थेट वाढेफाटा असा सलग 10 किलोमीटरचा पुल बांधण्याचे प्रयोजन होते, परंतु नंतर आयटीडी सिमेंटेशन कंपनीने आर्थिक तडजोड करीत कंपनीचा खर्च वाचवण्यासाठी व जास्त फायदा मिळवण्यासाठी सलग पुल करण्याऐवजी झिगझॅग पुल केले व सलग पुलाचे तुकडे करुन शिवराज, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, खेड व वाढेफाटा असे सहा पुल केले. यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळु लागले व अनेकांना जीव गमवावा लागला.

   तडे गेल्याने महेंद्र हॉटेल समोरचा पुल दोन वर्षापासुन बंद

दोन वर्षापुर्वी शिवराज प्रमाणेच हॉटेल महेंद्र एक्झीकेटीव्ह समोर खेडचौकातील पुलाची माती ढासळू लागली. त्यावेळी चिन्मय कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱयांनी ही बाब तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास आणुन दिली. तेव्हा पोलीस विभागाने नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडियाला याबाबत पत्र दिले. तेव्हापासुन हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामध्ये कोणतीही सुधारणा करण्याऐवजी हा करोडो रुपये खर्चून पुल वाहतुकीला उपलब्ध होवू शकत नाही यासारखे मोठे दुर्दैव नाही.

शासनाच्या काळ्या यादीतील कंपनीने नाव बदलुन केले काम

स्कान्सका या कंपनीला रिलायन्सने सबकॉन्ट्रक्ट दिले होते. परंतु त्यांचे काम समाधानकारक नसल्याने या कंपनीला शासनाने काळ्य़ा यादीत टाकले. परंतु या मल्टीनॅशनल कंपनीने नाव बदलले व स्कान्सकाऐवजी आयटीडी सिमेंटेशन असे नामांतर करुन पुन्हा याच कंपनीने काम सुरु केले. ज्यावेळी शिवराज चौकातील पुलाचे काम सुरु होते. त्याचवेळी हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, याची चौकशी करा अशी मागणी संकल्प इंजनिअरिंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी केली होती. तसेच सीबीआय चौकशीची मागणीही केली होती व पुल पडण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच आर्वी कन्सल्टंर कंपनीने सर्व पुलांची तपासणी करते व पुर्णत्वाचा दाखला देते या कंपनीने अद्याप शिवराजच्या पुलाला पुर्णत्वाचा व समाधान काम आहे असा दाखला दिलेला नाही.

Related posts: