|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » देगावफाटा येथे दुचाकी-कंटेनर अपघातात आजी व नातीचा मृत्यू

देगावफाटा येथे दुचाकी-कंटेनर अपघातात आजी व नातीचा मृत्यू 

वार्ताहर/कोडोली

सातारा शहरालगत देगावफाटा येथील चौकात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीकडून साताराकडे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात कुसुम दत्तात्रय तोडकर (वय 55)  व नात वैद्यवी हेमंत तोडकर (वय 7) दोघी रा. विश्रामबाग सांगली यांचा मृत्यू झाला. कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कुसुम दत्तात्रय तोडकर या आपल्या नातीसह कोडोली, चंदननगर सातारा येथील आपल्या मुली व जावई यांना भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. शनिवारी सांगली येथे जाण्यासाठी जावई अमोल मधुकर माळी (वय 35) रा. चंदननगर सातारा हे सासू कुसुम तोडकर व त्यांची नात यांना घेवून सातारा बसस्थानकाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात कुसुम तोडकर यांच्या डोक्यावरुन कंटेनरचे चाक गेले. या भीषण अपघातात कुसुम तोडकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर नात वैद्यवी तोडकर ही गंभीर जखमी झाली. तर जावई अमोल माळी हे किरकोळ जखमी झाले. या दोघांना येथील मोरया या खाजगी रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना नात वैद्यवी तोडकर हिचा मृत्यू झाला. आजी व नातीच्या झालेल्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली. अपघात घडल्यानंतर सारा ऍम्ब्युलन्स कोडोली व स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली परंतु जोरदार मार लागल्याने आजी व नातीचा मृत्यू झाला. याबाबत रात्री उशीरा कंटेनरचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.