|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ट्रकला कारची धडक, 4 जागीच ठार

ट्रकला कारची धडक, 4 जागीच ठार 

वार्ताहर/ विजापूर

रस्त्याकडेला बंद पडलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास हुनगुंद (जि. बागलकोट) येथील सोलापूर-चित्रदुर्ग मार्गावर घडली. या अपघातात पंकजसिंग (वय 45), उमाबाई (वय 48), पुष्पाबाई (वय 63) व श्रीकांताबाई (वय 65) हे चौघे जागीच ठार झाले. तर दीपक, सुनील, श्रीधर हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण बागलकोटचे रहिवासी आहेत.

 याबाबतची माहिती अशी की, शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास बागलकोट जिल्हय़ातील हुनगुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 वरील सोलापूर-चित्रदुर्ग मार्गावरील साई मंदिरासमोर विजापूरकडे जाणारा एक ट्रक बंद पडला होता. यावेळी बागलकोट येथील दोन कुटुंबे शुक्रवारी बळ्ळारी येथील वेंकटेश्वराच्या दर्शनाला गेली होती. देवाचे दर्शन घेऊन ते रात्री बळ्ळारीहून बागलकोटकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या भरधाव आरटीगा कारने शनिवारी पहाटे 4.30 च्या दरम्यान रस्त्यात थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात आरटीगा कारचा चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच हुनगुंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी बागलकोटमधील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. तर चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी इस्पितळात पाठविले आहेत.

कार-ऑटोरिक्षा अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार

कार व ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास तोरवी गावाजवळ घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास अक्कमहादेवी महिला विश्वविद्यालयाला जाण्यासाठी दोघी विद्यार्थिनी विजापूरहून ऑटोरिक्षातून निघाल्या होत्या. यावेळी तोरवी गावाजवळ समोरून येणाऱया कारने (क्र. एमएच09 बीएक्स 348) रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात मौनम्मा ओमकार नाईक, मूळची रायचूर व सध्या रा. विजापूर ही विद्यार्थिनी रिक्षातून खाली पडून गंभीर जखमी झाली. गावकऱयांनी तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले, पण उपचार चालू असताना ती मरण पावली. यावेळी डीएसएस संघटनेने विद्यार्थिनीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलसमोर ठेवून धरणे धरले व विद्यालयाला जाण्यासाठी दिवसभरात दोनच बसेस आहेत. यामुळे विद्यार्थिनींना 1 कि.मी. लांब बससाठी चालावे लागते. रिक्षाचीही व्यवस्था नाही. यामुळे या विद्यार्थिनीचा जीव गेला आहे, असा आरोप केला. याची माहिती मिळताच विश्वविद्यालयाच्या कुलपती सबीना यांनी हॉस्पिटलला भेट देऊन विद्यार्थिनींच्या बसच्या मागणीबाबत विचार करू, असे आश्वासन दिले.  या अपघाताची नोंद विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी कार जप्त करून कारचालकास अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.