|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणात केनियन युवकास अटक

काणकोणात केनियन युवकास अटक 

2.14 लाखांचे अमलीपदार्थ जप्त

प्रतिनिधी/काणकोण

 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी काणकोणच्या पाळोळे, होवरे, पाटणे किनाऱयांवर मागील दोन दिवसांत देशी आणि परदेशी पर्यटकांची अक्षरशः रीघ लागली. त्याचा फायदा उठवत काही परदेशी व्यक्तींनी राजरोस या ठिकाणी अमली पदार्थ विकायला सुरुवात केली आहे. मात्र काणकोण पोलिसांच्या सतर्कतेमुळे 30 रोजी मध्यरात्री एका केनियन नागरिकाला दुचाकीचा वापर करून अमली पदार्थ विकताना पकडण्यात आले. त्याच्याकडे एकूण 2 लाख 14 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.

काणकोणचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, प्रशाल देसाई आणि त्यांच्या अन्य सहकाऱयांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात अटक केलेल्या केनियन नागरिकाचे नाव एलिझा माल्कम वोनागो (21 वर्षे) असे आहे. त्यांच्याकडून 10.49 ग्रॅम कोकेन (किंमत 60 हजार रुपये), ‘एलएसडी’ 33 ग्रॅम (किंमत 80 हजार) 5.52 ग्रॅमच्या 20 गुंगीच्या गोळय़ा (किंमत 1 लाख) असे मिळून 2 लाख 14 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ त्याच्याकडे सापडले.

वरील अमली पदार्थांसह एक मोबाईल, इंटरनेट मोडेम, रोख 2200 व एक दुचाकी काणकोणच्या पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या वर्षी अमली पदार्थांसंदर्भात काणकोणच्या पोलिसांनी 10 गुन्हे नोंद केले, तर केवळ सरलेल्या डिसेंबर महिन्यात 3 गुन्हय़ांची नोंद झाली. एक परदेशी व्यक्ती भर रस्त्यावर दुचाकीवर बसून अमली पदार्थांचा व्यवहार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर  किनाऱयांवर गस्त घालणाऱया पथकाने ही कारवाई केली.

कोल्हापुरात ‘एलएलबी’चा विद्यार्थी

सदर केनियन युवक कोल्हापुरात ‘एलएलबी’ अभ्यासक्रमाच्या दुसऱया वर्षात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला मडगावातील न्यायालयासमोर उभे केले असता पुढील चौकशीसाठी पाच दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती काणकोणच्या पोलिसांनी दिली. निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.