|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडलेलेच!

कोकण रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडलेलेच! 

दोन ते तीन तास विलंबाने धावताहेत रेल्वेगाडय़ा, प्रवाशांची रखडपट्टी

प्रतिनिधी /खेड

कोकण मार्गावरून धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा दोन ते अडीच तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दिशेने धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा हाऊसफुल्ल धावत होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुरते बिघडले असून प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागत आहे.

नाताळ सुट्टीसह नववर्षासाठी रेल्वे प्रशासनाने 16 विशेष गाडय़ा सोडून पर्यटकांना दिलासा दिला होता. गोव्याच्या दिशेने येणाऱया पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. याचा विचार करत रेल्वे प्रशासनाने जादा विशेष गाडय़ा सोडून विशेषतः पर्यटकांच्या मार्गातील विघ्न दूर केले होते. मात्र कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया जादा विशेष गाडय़ांमुळे नियमित रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. याशिवाय विशेष गाडय़ाही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्या-त्या स्थानकात तिष्ठत बसावे लागत आहे.

थर्टीफस्टच्या दिवशी म्हणजेच रविवारी रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकाचा पुरता फज्जा उडाला होता. तब्बल 3 ते 4 तास विलंबाने धावणाऱया रेल्वे गाडय़ांमुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली. एकीकडे गोव्याच्या दिशेने जाणाऱया रेल्वेगाडय़ा खचाखच गर्दीने भरून धावत असतानाच दुसरीकडे मुंबईच्या दिशेने जाणाऱया रेल्वेगाडय़ा मात्र 3 ते 4 तास विलंबाने धावत होत्या. सोमवारी हीच परिस्थिती कायम राहिल्याने रेल्वेच्या कारभाराबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Related posts: