|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » हॅलेप, शरापोव्हाची विजयी सलामी

हॅलेप, शरापोव्हाची विजयी सलामी 

वृत्तसंस्था/ शेनझेन, चीन

जागतिक अग्रमानांकित सिमोना हॅलेप व रशियाची मारिया शरापोव्हा यांनी नवीन वर्षाची शानदार सुरुवात करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवित शेनझेन ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले.

हॅलेपने अमेरिकेच्या निकोल गिब्जवर 6-4, 6-1 अशी मात करताना तीन बिनतोड सर्व्हिस केल्या व 12 विजयी फटके मारले. दुसऱया फेरीत तिची लढत चीनच्या डुआन यिंगयिंगशी होणार आहे. यिंगयिंगने एवगेनिया रोडिनाचा 6-2, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे. ‘शेनझेनमध्ये खेळणे नेहमीच आनंददायक अनुभव असतो. जागतिक अग्रमानांकित असताना या वषीचा हा माझा पहिला विजय आहे. साहजिकच मी खुश आहे आणि त्याचा आनंदही लुटत आहे,’ असे हॅलेप म्हणाली. तिने येथील स्पर्धा 2015 मध्ये जिंकली होती.

पाच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया शरापोव्हाने रोमानियाच्या मिहीला बुझारनेस्क्मयूचा 6-3, 6-0 असा पराभव केला. तिची पुढील लढत मागील वषी या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविलेल्या ऍलिसन रिस्केशी होईल. रिस्केने चीनच्या पाचव्या मानांकित वांग कियांगला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली आहे. बिगरमानांकित डांका कोव्हिनिकनेही धक्कादायक निकाल देताना ग्रीकच्या सातव्या मानांकित मारिया सक्करीवर 4-6, 6-2, 6-3 अशी मात केली. चीनच्या झांग शुआइने रशियाच्या ऍना ब्लिन्कोव्हाचा 6-3, 6-4 असा तर टिमीया बॅबोसने चीनच्या वांग झियूचा 6-1, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे.