|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘कि चेन’ संकलनाचा छंद बनला तीन पिढय़ांचा वारसा

‘कि चेन’ संकलनाचा छंद बनला तीन पिढय़ांचा वारसा 

प्रतिनिधी/ फोंडा

इंटरनॅट, वॉट्सऍप, फेसबुक या आधुनिक माध्यमांनी माणसाच्या जीवनात प्रवेश केल्यानंतर आपले जगच बदलून गेले आहे. एकेकाळी छोटय़ाछोटय़ा गोष्टींमधून जोपासले जाणारे छंद व आठवणी म्हणून गोळा केलेल्या वस्तूंच्या संकलनाला आपल्या आयुष्यात जागा उरलेली नाही. मात्र कुटुंबितील एका व्यक्तीने जोपालेला विशिष्ट छंद एका कुटुबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहवा व आजोबांपासून नातवंडापर्यंत निरंतर सुरु राहावा, असे क्वचितच घडते. निरनिराळय़ा हजारो ‘कि चेन’ जमविण्याचा छंद जोपासणारे कुर्टी-फोंडा येथील बोरकर कुटुंबिय त्यामुळेच जगावेगळे म्हणावे लागेल.

प्रदीप बोरकर व त्याचे कुटुंब गेली साधारण पन्नास-पंचावन्न वर्षे या ‘कि चेन’ संकलनाचा एक भाग बनून राहिले आहे. निरनिराळय़ा प्रकारच्या साधारण 3500 कि चेन जमविणाऱया बोरकर कुटुंबियांचा हा छंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविला गेला आहे. त्यांच्या घरात प्रवेश केल्यानंतर चारही बाजूच्या भिंतीवर दृष्टीस पडतात त्या केवळ कि चेनच. प्रदीप बोरकर यांचे वडिल तुळशीदास शंभू बोरकर यांनी मुंबईत वास्तव्यास असताना 1962 साली कि चेन संकलनाचा हा छंद जोपासला होता. मुंबईतील सांताक्रूझ, बोरीवली व नंतर विरार अशा विविध ठिकाणच्या त्यांच्या वास्तव्याच्या काळात 1991 पर्यंत तब्बल दोन हजार कि चेन त्यांनी जमविल्या. त्यानंतर 1997 साली त्यांनी मुंबईतून गोव्यात कायमचे बस्तान हलविले. गोव्यात कुर्टी-फोंडा येथे राहायला आल्यानंतरही त्यांचा हा छंद निरंतरपणे पुढे सुरु राहिला. तुळशीदास बोरकर यांच्यापश्चात त्यांचे सुपुत्र प्रदीप बोरकर यांनीही आपल्या नोकरी व्यावसायातून वेळ काढीत साधारण साडेतीन हजारपर्यंत कि चेनचे संकलन वाढविले. सध्या त्यांची नातवंडे व प्रदीपची मुले निलिमा, निकिता, नंदिता व इतर कुटुंबिय हा अनोखा वारसा पुढे नेत आहेत. 1995 साली लिम्का बुक ऑफ रेकॉडमध्ये कि चेन संकलनाचा हा विक्रम नोंदविला गेला व अनेकांनी त्यांच्या या आगळय़ा वेगळय़ा छंदाची दखल घेतली.

बोरकर कुटुंबियांच्या संकलनामध्ये विविध राष्ट्रांच्या नाण्यांच्या कि चेनपासून विविध कंपन्यांनी वेळोवेळी काढलेल्या कि चेनचा समावेश आहे. त्यापैकी बऱयाच कि चेन दुर्मिळ व त्यांना विशिष्ट महत्त्व आहे. एअर इंडियाची सुरुवातीची कि चेन, मर्सडिज मोटार, बीएम डब्ल्यू मोटार कंपनी, काही कंपन्या व संस्थांनी सुवर्ण व शतक महोत्सवानिमित्त काढलेल्या विशिष्ट कि चेनही त्यांच्या संकलनात आहेत. विशेष म्हणजे यापैकी एकही की चेन त्यांनी विकत घेतलेली नाही व प्रत्येक की चेन समान नाही. विविध कंपन्यांच्या कि चेन बरोबरच, विविध राष्ट्रांचे ध्वज, प्राण्यांच्या प्रतिकृती, शितपेय, देवतांच्या प्रतिकृती व धार्मिक प्रतिके, शंख व शिंपल्या, कॅलेंडर्स, बंदुका व शस्त्राच्या प्रतिकृती अशा निरनिराळय़ा विभागात सुनियोजितपणे त्यांनी कि चेनचे केलेले संकलन पाहायला मिळते. कि चेनच्या संकलनाबरोबरच प्रदीप बोरकर यांनी वाहनांच्या विविध मॉडेल्स संकलनाचा वेगळा छंद स्वत: जोपासला असून त्यात साधारण 143 मॉडेल्स आहेत. याशिवाय वेगवेगळे लायटर्सही त्यांच्या संग्रहात जमा आहेत.

संगणक तंत्रज्ञानाच्या या जमान्यात माणसाची संकलन क्षमताच हरवत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचे मोल तात्कालीक ठरु लागल्याने छंद कुठपर्यंत जोपासला जावा यावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. बोरकर कुटुंबियांनी मात्र या तात्कालिकतेवर मात करीत हा छंद एका वारशाच्या रुपानेच जपलेला आहे. सध्या या कुटुंबाची तिसरी पिढी ‘कि चेन’च्या या साखळीमध्ये बांधली गेली आहे.

Related posts: