|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डॉक्टरांचे पुन्हा आज आंदोलन

डॉक्टरांचे पुन्हा आज आंदोलन 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था बंद करुन त्याऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन स्थापन करण्याची योजना केंद्राने आखली आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे अस्त्र उगारले आहे. मंगळवार दि. 2 रोजी आंदोलन करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेतर्फे जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत अध्यक्षा डॉ. सुचित्रा लाटकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यापूर्वी असलेल्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या नावाच्या संस्थेचे रुपांतर आता आयोग स्वरुपात करण्याची सूचना नीती आयोगाने केली आहे. यासंदर्भात हे पाऊल उचलण्यात आले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया संस्थेने आजवर ‘डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी स्थापन केलेली डॉक्टरांची संस्था’ असा लौकिक मिळविला आहे. आता ही संस्था बंद होणार आहे. याला देशभरातील डॉक्टरांनी आक्षेप घेतला आहे. एम. सी. आय. संस्थेमध्ये आवश्यक बदलांची प्रक्रिया पूर्ण केल्यास हा मुद्दा निकाली काढता येणे शक्मय आहे. परंतु ही संस्था बंद करुन सरकारच्या अधिपत्याखाली नवीन आयोग स्वरुपात कार्यारंभ करणे चुकीचे आहे, असे म्हणणे नमूद करण्यात आले आहे.

या आयोगामुळे राज्यांना यामध्ये प्रतिनिधीत्व मिळणे अवघड होणार आहे. एका वेळी पाच राज्यांच्या सदस्यांना प्रतिनिधीत्वाची तरतूद या प्रस्तावात आहे. त्यामुळे एखाद्या राज्याला  संधी मिळण्यास तब्बल 20 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच या आयोगाचे अध्यक्षपद हे केंद्र सरकारच्या एखाद्या सचिवांकडे राहणार आहे. यामधून भ्रष्टाचार अधिक वाढण्याचा धोका उद्भवतो. तसेच वैद्यकीय क्षेत्राचा दर्जाही खालावण्याचा धोका आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून या प्रस्तावाला विरोध दर्शविण्याचा निर्णय आयएमएच्या  बेळगाव शाखेने  घेतला आहे. त्यानुसार दि. 2 रोजी बंद पाळण्याचे ठरविण्यात आले आहे.