|Sunday, July 21, 2019
You are here: Home » उद्योग » खात्यात किमान शिलकी नसल्याने बँकांना लाभ

खात्यात किमान शिलकी नसल्याने बँकांना लाभ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बँक खात्यात निर्धारित शिलकी नसल्यास खातेदारांकडून दंडाच्या स्वरुपात रक्कम वसूल करण्यात येते. ग्रामीण भागात अनेकांच्या खात्यात किमान सरासरी बचत ठेव नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र याच पैशांतून सरकारी बँका मात्र मोठय़ा प्रमाणात नफा कमवित आहेत. आरबीआयनेही हा नियम कायम ठेवल्याने बँकांना चांगलाच लाभ होत आहे. पाच वर्षांच्या कालावधीनंतर चालू आर्थिक वर्षात हा नियम पुन्हा लागू करण्यात आला आहे.

अर्थ मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर 2017 दरम्यान बँक खात्यात किमान रक्कम नसल्याने भारतीय स्टेट बँकेने तब्बल 1,771 कोटी रुपये कमविले आहे. ही रक्कम एका तिमाहीत बँकेने कमविलेल्या नफ्यापेक्षा जास्त आहे. जुलै सप्टेंबर या तिमाहीत बँकेने नक्त नफा 1,581.55 कोटी रुपयांचा मिळविला होता. याचप्रमाणे एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीतील नक्त नफा 3,586 कोटी रुपये होता. म्हणजेच बँकेने किमान शिलकीच्या माध्यमातून दंड वसूल करत निम्मी रक्कम वसूल केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एसबीआयकडून दंड वसूल करण्यात आलेला नव्हता.

पंजाब नॅशनल बँकेने एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान दंडाच्या माध्यमातून 97.34 कोटी रुपये जमा केले आहेत. सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने या कालावधीत 68.67 कोटी रुपये आणि कॅनरा बँकेने 62.16 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. पंतप्रधान जनधन योजनेला या नियमातून वगळण्यात आले आहे. तसेच सामान्य बचत खाते असणाऱयांना पंतप्रधान जनधन योजनेत आपले खाते वळविण्याचा अधिकार आहे.

सरकारी बँकांव्यतिरिक्त खासगी बँकांही किमान शिलकी नसल्यास खातेधारकांकडून दंड वसूल करतात. 1 एप्रिल 2017 पासून हा नियम लागू करण्यात आलेला असून ग्रामीण, निमशहरी, नागरी आणि मेट्रो भागात वेगवेगळा दंड आकारण्यात येतो.