|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तलाक विधेयक : विरोधकांचा पुन्हा नेहमीचा खेळ

तलाक विधेयक : विरोधकांचा पुन्हा नेहमीचा खेळ 

विलंब करण्यासाठी संसदीय समितीकडे देण्याची मागणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

तिहेरी तलाकच्या तावडीतून मुस्लीम महिलांची सुटका करण्यासाठी लोकसभेने संमत केलेले तिहेरी तत्काळ तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत अडकण्याचे चिन्ह दिसत आहे. ते अधिक चर्चेसाठी संसदीय समितीकडे द्यावे, अशी मागणी सहा विरोधी पक्षांनी केली आहे. तर काँगेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. तथापि, तो पक्षही अंतिमतः या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तृणमूल काँगेस, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, द्रमुक आणि मार्क्सवादी पक्षाने हे विधेयक समितीकडे सोपवावे अशी मागणी केली आहे. तर काँगेसने काही सुधारणा सुचविल्या आहेत. सुधारणांचा आग्रह धरू नये, अशी सूचना भाजपने काँगेसला केली आहे. हे विधेयक आज बुधवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे.

काँगेसशी चर्चा

काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजपने केले असून त्या पक्षाशी चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी स्पष्ट केले. तर काँग्रेस या विधेयकासंबंधी संभ्रमात आहे, अशी टीका मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली. बुधवारी राज्यसभेत काँगेसची भूमिका स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.

विरोधक उघडे पडणार

या विधेयकाला पाठिंबा दिला तर मुस्लीम मते गमाविण्याची चिंता विरोधकांना वाटते. तर विरोध केला तर त्यांची बनावट धर्मनिरपेक्षता उघडी पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे टाळाटाळ करण्यासाठी संसदीय समितीचा आग्रह धरला जात आहे, अशी टीका काही जाणकारांनी केली आहे. आता हे विधेयक राज्यसभेत आल्यानंतरच त्याचे भवितव्य ठरणार आहे.