|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्वसामान्यांना पोषक ठरणाऱया विकासावर भाजप सरकारचा भर

सर्वसामान्यांना पोषक ठरणाऱया विकासावर भाजप सरकारचा भर 

प्रतिनिधी/ वाळपई

गोवा सरकारने विकासाच्या नावाखाली कोणत्याही स्वरुपाचा बाऊ केला नसून सर्वसामान्यांना पोषक ठरणाऱया विकासावरच प्रामुख्याने भर दिला आहे. गोव्यातील जनतेच्या समस्या दूर करण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. यामुळे सरकारच्या एकूण कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य जनता समाधानी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असे उद्गार सभापती व सांखळी मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

 होंडा-सांखळी दरम्यानच्या सुपाची पुड याठिकाणी सरकारतर्फे बांधण्यात आलेल्या समांतर पुलाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. येणाऱया काळात सांखळी मतदारसंघातील वेगवेगळय़ा स्तरावर विकासाचे महत्त्वाचे टप्पे पार करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पुलाच्या एकूण बांधकामाबाबत डॉ. सावंत यांनी सांगितले की, सांखळी व पर्ये मतदारसंघाबरोबरच सत्तरी व डिचोली तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा समांतर पूल आहे. सदर ठिकाणी पूर्वीचा पूल अरुंद स्वरुपाचा असल्याने याठिकाणी वाहनचालकांना अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यावेळची गरज म्हणून या पुलाची उभारणी करण्यात आली होती मात्र आता वाहनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने सदर पूल अपुरा ठरत आहे. यामुळे याठिकाणी समांतर पुलाची गरज निर्माण झाली होती. वाहनचालकांच्या मागणीनुसार समांतर पुलाची योजना अंमलात आणण्यात आली, असे सांगताना त्यांनी या पुलामुळे वाहनचालकांची चांगली सोय होणार असल्याचे सांगितले.

यावेळी हरवळे पंचायतीचे सरपंच सागर मळीक यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासूनची नागरिकांची ही मागणी धसास लावण्यासाठी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे वाहनचालकांची चांगली सोय झाली आहे.

यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण करण्यात आले.