|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भीमसैनिक आक्रमक, जनजीवन विस्कळीत

भीमसैनिक आक्रमक, जनजीवन विस्कळीत 

गुहागर, चिपळुणात दगडफेक, गाडय़ा फोडल्या

जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

ठिकठिकाणी रास्तारोको, वाहतूक विस्कळीत

प्रतिनिधी /रत्नागिरी, चिपळूण

भिमा-कोरेगावच्या घटनेचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाभरात हजारो भीमसैनिक बुधवारी रस्त्यावर उतरले. घटनेचा निषेध व जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ठिकठिकाणी टायर जाळून रास्तारोको करण्यात आला, तर बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. जिल्हाभरात मोर्चा, बंद, रास्तारोकोद्वारे करण्यात आलेल्या निषेधामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान चिपळुणात दोन वाहनांची तोडफोड व दुकानावर दगडफेक तर आबलोली येथे बसच्या काचा फोडण्यात आल्याने आंदोलनाला हिंसव वळण मिळाले.

चिपळूण ः येथे आंबेडकर चळवळीतील सैनिकांनी काढलेला भव्य मोर्चा. (छाया- सचिन शेठ, चिपळूण)

रत्नागिरीत मोर्चेकऱयांनी जयस्तंभ येथे सुमारे 3 तास रास्तारोके केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मोर्चेकऱयांनी रत्नागिरी बंद करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला पण पोलिसांनी कुशलतेने त्यावर नियंत्रण राखले. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विविध आंबेडकरी अनुयायी संघटनांचे कार्यकर्ते जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाजवळ मोठय़ा संख्येने एकत्र आले. आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर एल. व्ही. पवार, जे. पी. जाधव, प्रशांत कांबळे, मिलींद जाधव, सी. ए. जाधव, सी. डी. गायकवाड, बी. एस. जाधव, शैलेश जाधव, तानाजी कुळये यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भारिप बहुजन महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय बौध्द महासभा यांचा सहभाग होता. मोर्चावेळी या संघटनांच्या पदाधिकाऱयांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रदीप पी यांची भेट घेत भिमा-कोरेगाव येथे जातीयवाद्यांनी घडविलेल्या दंगलीचा मास्टरमाईंड शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

त्यानंतर जयस्तंभ येथे सुमारे तीन तास रास्तारोके करण्यात आला. त्यानंतर भीमसैनिकांनी रत्नागिरी बंदचा पवित्रा घेतला. आक्रमक कार्यकर्ते जयस्तंभ येथून रत्नागिरी बाजारपेठेकडे वळले. दुकानदार, व्यापाऱयांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र पोलीसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांची मनधरणी केली. त्यामुळे हा मोर्चा पुन्हा जयस्तंभाच्या दिशेने माघारी वळला. मोर्चा डॉ. आंबेडकर पुतळय़ाजवळ आल्यातंर तो मारूतीमंदीरकडे नेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला मात्र पोलिसांनी त्याचठिकाणी रोखून धरले. यावेळी स्पेशल पोलीस फोर्सही मागवण्यात आली. अखेर दुपारी 2.30 वा.च्या सुमारास हे आंदोलन मागे घेण्यात आले.

चिपळुणात दगडफेक, गाडय़ा फोडल्या

चिपळुणात शाहू, फुले, आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी बुधवारी भव्य मोर्चा काढला. बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. या मोर्चादरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गसह चिपळूण-कराड मार्गावर रास्तारोको करण्यात आला. तसेच दोन वाहनांची तोडफोड करत एका दुकानावर दगडफेक करण्यात आली. तसेच सावर्डे येथे टायर पेटवून तासभर महामार्ग बंद रोखून धरला.

11 वाजता डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरूवात झाली. चौकातच ठाण मांडून मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला. यावेळी सुमो व इंडिका चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकानी दोन्ही गाडय़ा फोडल्या. पोलिसांनी मध्यस्थी करून या गाडय़ा जमावातून बाहेर काढल्या.

त्यानंतर गुहागर-विजापूर मार्गावरून मोर्चा शहराकडे आला. यावेळी भिडेगुरूजी यांच्या कार्यक्रमाचे फलक फाडण्यात आले. जुने बसस्थानक येथे मोबाईल रिचार्ज दुकानावर दगडफेक करण्यात आली. खेडेकर क्रीडा संकुलासमोरील कार्यालयाचे शटर अर्धवट ओढण्यात आल्याने जमावाने काहींना धक्काबुक्की केली. त्यानंतर प्रांत कार्यालयावर मोर्चाने धडक देत प्रांताधिकारी सौ. कल्पना जगताप-भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चात आरपीआयचे अध्यक्ष के. डी. कदम, भारीपचे अध्यक्ष महेश सकपाळ, रिपब्लिक सेनेचे अध्यक्ष संदेश मोहिते, जयंत जाधव, बहुजन समाजपार्टीचे अध्यक्ष सचिन मोहिते, आरपीआयचे माजी तालुकाध्य राजू जाधव, तालुका बौद्धजन हितसंरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुभाष जाधव, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष दत्ताराम मोहिते, बौद्धजन पंचयात समितीचे प्रमुख शीलभद्र जाधव, अध्यक्ष उत्तम जाधव, नगरसेवक उमेश सकपाळ, महेंद्र कदम, समता समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील सावंत, जयभीम विकास मंडळाचे अध्यक्ष विद्याधर गमरे, हितसंरक्षण समितीचे सरचिटणीस अशोक कदम, राजेंद्र मोहिते,प्रवीण कदम, महिला आघाडीच्या सौ. वंदना मोहिते, प्रभाकर जाधव, हिंदुरावर पवार, वडार समाजाचे हरिश्चंद्र चव्हाण, मातंग समाजाचे आनंद खंडझोडे, शरद कदम, स्नेहा जाधव, उदय कदम, प्रवीण जाधव आदी सहभागी झाले होते.

अनुचित प्रकार घडू नये म्हणून तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर हे मोर्चेकऱयांबरोबरच मार्गक्रमण करत होते. अप्पर जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक मितेश घट्टे हे येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

सावर्डेत महामार्गावर टायर पेटवले

सावर्डे येथेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नांदगाव बौद्धवाडी येथे भीम बांधवांनी सर्व प्रथमसकाळी 8 वाजता एस. टी. बस, तसेच खाजगी वाहतूक, स्कूल बस रोखून धरत रस्ता रोको केला. सावर्डे परिसरातील भीमसैनिकांकी आक्रमक होत महामार्गावर टायर पेटवत एक तास वाहतूक रोखून धरली. त्यानंतर आपला मोर्चा सावर्डे बाजारपेठकडे वळवला. दहिवली, वहाळफाटा तसेच सावर्डे स्टँड व बाजारपेठ बंद करत सावर्डे दहीवली फाटा ते हॉटेल राज्यस्थानी व पुन्हा वहाळ फाटय़ापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सावर्डेतील सर्व दुकाने बंद करून बाजारपेठ बंद करण्यात आली दरम्यानच्या काळात 11 ते 12 या कालावधीत दहिवली फाटा ते सावर्डे बाजारपेठ असा रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या वाहनाच्या रांगा लागल्या. मात्र वाहनांच्या रांगा असतानाच चिपळूणकडून येणाऱया रुग्ण वाहिकेला रुग्णांलयात जाण्यासाठी मार्गस्थ करून भीम सैनिकांनी माणुसकीचे दर्शन घडवले

आबलोलीत एस. टी. च्या काचा फोडल्या

गुहागर शहर, शृंगारतळी, आबलोली, तळवली बाजारपेठा बंद ठेऊन भिमसैनिकांनी गुहागर पोलीस स्थानकावर निषेध मोर्चा काढून निवेदन सादर केले. दरम्यान आबलोली येथे बसच्या काचा फोडण्यात आल्याने आंदोलनाला गालबोट लागले. आबलोली बाजारपेठेत 6 ते 7 एस.टी. अडवण्यात आल्या. सकाळी 8.30 वाजता अज्ञाताकडून आबलोली वस्तीच्या बसच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र हा प्रकार मोर्चादरम्यान झाला नसल्याने तक्रार नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एस.टी.चे 20 हजार रूपयाचे नुकसान झाल्याचे आगारप्रमुख मृदुला जाधव यांनी सांगितले.

गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ, गुहागर तालुका बौद्ध युवा मंच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ), बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन सेना या प्रमुख संघटनांबरोबर तालुक्यातील 78 शाखांच्या भिमसैनिकांनी शहरातील शिवाजीचौक येथून मोर्चा काढून गुहागर तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी सुरेश सावंत, मारूती मोहिते, सुरेश गमरे, सुनील गमरे, संदीप पवार, वैभव गमरे, प्रकाश सावंत, विश्वनाथ कदम, पराग सावंत, संजय गमरे, सचिन कदम, रूपेश सावंत, संदीप कदम, समिर कदम, संदेश कदम आदी सुमारे 600 भिमसैनिक उपस्थित होते.

जनतेचे आतोनात हाल

दरम्यान बुधवारच्या बंदमध्ये शहरातील बहुतांशी बाजारपेठ बंद राहील्याने तसेच खासगी आणि एस.टी. वाहतुकही बंद ठेवली गेल्याने शहरात वैद्यकीय उपचारासह अन्य कारणासाठी आलेल्या सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झाली. त्यातच उपहारगृहही बंद राहिल्याने आणखी भर पडली. सकाळी बाजारपेठेत काही दुकाने, महामार्गावरील टपऱया सुरू असताना त्याही जबरदस्तीने बंद करावयास लावण्यात आल्याने व्यवसायिकानी काहीशी नाराजी व्यक्त केली.