|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालूंच्या शिक्षेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

लालूंच्या शिक्षेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर 

वृत्तसंस्था /रांची :

कोटय़वधी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणातील आरोपी, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवर गुरुवारी होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. न्यायालयाने इंग्रजी ‘के’ अक्षरापर्यंत नावे असणाऱया आरोपींच्या नावावर शिक्षेची सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केल्याने लालूप्रसाद यांना सुनावण्यात येणारी शिक्षा एक दिवस पुढे गेली. आता शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

  21 वर्षांपूवी झालेल्या चार घोटाळय़ातील देवघर कोषागारातील भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयात खटला सुरू होता. 89 लाख 27 हजारांच्या या भ्रष्टाचार प्रकरणी 23 डिसेंबर 2017 रोजी न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह 16 आरोपींना दोषी ठरवले होते. त्यांना 3 जानेवारी रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.  दोषींची रवानगी बिरसा मुंडा तुरूंगात करण्यात आली होती. 3 रोजी वकील बिंदेश्वरी प्रसाद यांचे निधन झाले. वकिलांनी शोकसभेसाठी  सुनावणी एक दिवसासाठी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने इंग्रजी ‘के’ अक्षराने सुरुवात होणाऱया आरोपीपर्यंतच शिक्षेची सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. लालूप्रसाद यावद यांच्या नावाची सुरुवात इंग्रजी ‘एल’ अक्षराने होत असल्याने त्याची शिक्षा एक दिवस लांबणीवर पडली.