|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आसगावात 22 कोटी खर्चून वीज केंद्र उभारणार

आसगावात 22 कोटी खर्चून वीज केंद्र उभारणार 

प्रतिनिधी /म्हापसा :

आसगाव भागात विजेचा लपंडाव सुरू आहे हे लक्षात घेऊन आसगाव येथे वीज खात्याचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हापसा येथे बोलताना दिली. म्हापसा सरकारी संकुलात उपजिल्हाधिकारी कार्यालयात मंत्र्यांनी गुरुवारी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मांद्रे भागासाठीही सुमारे 45 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. बार्देश येथे पाण्याची समस्या तीव्र असून यावर उपाय म्हणजे येथे नवी पाण्याची टाकी उभारण्यात येणार  आहे. हणजूण भागात गेल्या 20 वर्षापासून 50 घरांना पाणी मिळत नव्हते. त्याकडे लक्ष देताना नवीन मोटार व नवीन पाईपलाईन घालून येथील नागरिकांना पाणी देण्यात येईल, असे पालयेकर यांनी सांगितले.

कुचेली म्हापसा ते शिवोली दरम्यान नवीन पाईपलाईन

आंत शिवोलीतील जनतेला गोवा फॉरवर्डवर विश्वास आहे. गोयकारांचे राज्य सत्तेत आहे. शिवोली मतदारसंघात एकूण 23 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. म्हापसा कुचेली ते शिवोली बाजारपेठ दरम्यान नव्याने पाईपलाईन घालण्यात येणार आहे. शिवोली बायपास रस्ता रुंद करण्यात येणार असून ते काम जीएसआयडीसी मार्फत करण्यात येईल. शिवोलीत सर्वत्र हॉटमिक्स रस्ते करण्यात येणार आहेत. हॉटमिक्सचे काम दर्जेदार असेल, असेही मंत्री म्हणाले.

दरगुरुवारी म्हापसा सरकारी संकुलात उपस्थित राहणार

आपण दर गुरुवारी म्हापसा सरकारी संकुलात नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे. बार्देश तालुक्यातील अन्य मंत्री येथे नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी का येत नाहीत हे आपल्याला माहित नाही. कदाचित ते आपल्या मतदार संघातच नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी उपस्थित होत असतील. ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर लवकरच याच संकुलात नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी उपस्थित राहतील. म्हादईबाबत आपला निर्णय ठाम असून पत्रकारांनी नाहक यावर भडक लिखाण करून या प्रश्नाला कलाटणी देऊ नये, असेही मंत्री पालयेकर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.