|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » मिथेनॉल प्रकल्पासाठी 1.5 अब्ज डॉलर्स देणार

मिथेनॉल प्रकल्पासाठी 1.5 अब्ज डॉलर्स देणार 

खनिज तेलाची आयात कपातीसाठी प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खनिज तेलाच्या वाढत्या किमती पाहता देशाच्या वित्तीय तूटीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने इंधनामध्ये मिथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. आता मिथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून 1.5 अब्ज डॉलर्स देणार येणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. इंधनामध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याने खनिज तेल आयातीचे बिल कमी होण्यास मदत होईल.

इंधनामध्ये मिथेनॉलचा वापर करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला हातभार लागण्याची शक्यता आहे. वाहतूक इंधन आणि घरगुती इंधनासाठी मिथेनॉलचा वापर वाढविता येईल. मिथेनॉल हे स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याने ग्रामीण भागात वापरल्यास फायदा होईल. स्वयंपाकघर आणि वाहतुकीसाठी मिथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील, असे नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी सांगितले.

2030 पर्यंत खनिज तेल आयात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तोपर्यंत मिथेनॉलचा वापर वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मिथेनॉल हे नैसर्गिक वायू, कोळसा आणि पुननिर्मित अन्नपदार्थांपासून तयार करण्यात येते. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलची मिसळ करण्यात येत आहे. सध्या चीन इंधनामध्ये 15 ते 20 टक्के मिथेनॉल मिसळत आहे. गेल्या काही महिन्यांत खनिज तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने त्याचा भार वित्तीय तुटीवर पडत आहे. सरकारने याची माहिती अगोदरच राज्यसभेत दिली आहे.