|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना पाच वर्षाची शिक्षा

मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना पाच वर्षाची शिक्षा 

प्रतिनिधी/सोलापूर

शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. के. अनभुले यांनी पाच वर्षाची शिक्षा आणि 20 हजार रूपये दंड ठोठावला.

दऱयाप्पा षडाक्षरी अरवत आणि नागनाथ मल्लीकार्जून अरवत असे आरोपींची नावे आहेत. यातील हकीकत अशी की, 10 एप्रिल 2015 रोजी फिर्यादी व त्यांचे मित्र हे दोघे अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील विरभर्देश्वर मंदिराजवळून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांनाही जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास आरोपी हे त्यांच्या सात साथीदारासह फिर्यादीच्या घरी गेले. तेव्हा फिर्यादी व मित्र दोघेही घरात बसले होते. त्या दोघांना बाहेर ओढून जबर मारहाण करुन शिवीगाळ केली. पायातील बुट काढून त्यात पाणी भरून दोघांना जबरदस्तीने प्यायला लावले. तसेच याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दोघांनीही दोन्ही आरोपींसह मोरत्याप्पा संगाण्णा अरवत, षडाक्षरी संगण्णा अरवत, कल्लाप्पा तामण्णा अरवत, मल्लिकार्जून मोरत्याप्पा अरवत, लक्ष्मण दऱयाप्पा अरवत, मल्लिकार्जून गुरूप्पा उमदी आणि संगप्पा रामण्णा उमदी असे एकूण नऊ जणांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यात सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी दऱयाप्पा अरवत आणि नागनाथ अरवत यांना भादवि. कलम 452 प्रमाणे 5 वर्षे कारावास व 10 हजार रूपये दंड, कलम 323 प्रमाणे 1 वर्षाचा कारावास, 504 प्रमाणे 2 वर्षे कारावास आणि कलम 506 प्रमाणे 5 वर्षे कारावास व 20 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावले. यात सरकारतर्फे ऍड. प्रदिपसिंग रजपूत तर आरोपीतर्फे ऍड. व्हि.डी. फताटे यांनी काम पाहिले.