|Sunday, January 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दंगलमुक्त आटपाट

दंगलमुक्त आटपाट 

आटपाट नगरातल्या जनतेचे इतिहासावर अलोट प्रेम आहे. इतिहासानंतर आपले कुटुंब, आपली पोटजात, जात,  धर्म यावर या क्रमाने ते श्रद्धा ठेवतात. देशातली साक्षर मंडळी अष्टौप्रहर इतिहास लिहित असतात. सगळेजण स्वतःच्या धर्मासाठी, जातीसाठी आणि पोटजातीसाठी म्हणून स्वतंत्र इतिहास लिहित असतात.

आटपाटचे राष्ट्रीय नेते (कोणतेही अमली द्रव्य न घेता) आटपाटला महासत्ता बनवण्याच्या वल्गना करीत असले तरी जनतेला महासत्ता होण्याऐवजी इतिहासत्ता होण्यात रस असतो. त्यामुळे तिथे रोज कुठे ना कुठे दंगल, बंद वगैरे चालू असतात. अनेक वेळा तिथल्या पब्लिकला खळ्खटय़ाकसाठी दगडांची आणि जाळण्यासाठी एसटी बसेसची टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याचे आश्वासन देऊन एक पक्ष तिथे प्रचंड बहुमताने सत्तेवर आला. त्यानंतर कोणतीही जुमलेबाजी न करता त्यांनी आश्वासनपूर्तीला हात घातला.

सरकारने ‘आटपाट नरेगा’ योजनेखाली मजुरांकडून देशातल्या प्रत्येक गावाबाहेरच्या सर्व टेकडय़ा फोडून विविध आकाराचे दगड बनवून घेतले. एसटी महामंडळ बरखास्त करून सर्व बसेस जाळण्यासाठी उपलब्ध केल्या. दगड आणि बसेसचे ‘प्रथम येणारास प्राधान्य’ तत्त्वावर वाटप केले. प्रादेशिक पक्षांना साध्या बसेसचे आणि राष्ट्रीय पक्षांना एसी बसेसचे (जाळण्यासाठी) वाटप केले. यावर आक्षेप घेत कॅगचे प्रमुख म्हणाले की लिलाव पद्धतीने वाटप केले असते तर जो काल्पनिक फायदा होणार होता तो न झाल्यामुळे देशात कित्येक अब्ज रुपयांचा फ्रॉड झाला आहे. मग सरकार उलथून पडल्यावर नवे सरकार आले आणि कॅगप्रमुखांना सरकारात मानाची पदे मिळाली. दरम्यान न्यायालयाने काही दगड आणि काही बसेसचे वाटप बेकायदा ठरवून रद्द केले. नव्याने वाटप केल्यावर नव्या सरकारने तिजोरीत जास्त रक्कम जमा झाल्याचा दावा देखील केला. खळ्खटय़ाकसाठी पुरेसे दगड आणि जाळण्यासाठी पुरेशा बसेस उपलब्ध झाल्याने सर्व पक्ष खुश झाले. 

नव्या सरकारला पाडण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या. धूम्रपान, गुटखा, दारू, परदारागमन आदि नामांकित व्यसनात बुडालेला नेता दवाखान्यात दाखल झाल्यावर मेला तर कार्यकर्त्यांकडून डॉक्टरला चोपण्यासाठी विशेष कायदा करण्याची मागणी
केली.

सरकारने यावर समिती नेमून एक विधेयक संसदेत आणले. त्यानुसार प्रत्येक रुग्णालयाने मार खाण्यासाठी स्वतंत्र निवासी डॉक्टर्स नेमावेत आणि आर्किटेक्टकडून रुग्णालयाच्या प्रतिकृती बनवून त्या आंदोलकांना (जाळण्यासाठी) माफक दरात उपलब्ध कराव्यात असे सुचवले आहे.

Related posts: