|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीन 2020 पर्यंत गरिबी हटविणार

चीन 2020 पर्यंत गरिबी हटविणार 

98 लाखांपेक्षा अधिक जणांना स्थलांतरित करणार

वृत्तसंस्था/ बीजिंग

 चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी 5 वर्षांच्या दुसऱया कार्यकाळात देशातून गरिबीचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. चीनचे अधिकारी जवळपास 1 कोटी लोकांना त्यांच्या घरातून हलवत गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

चीनने 2020 पर्यंत देशातील गरिबीचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य राखले असून क्षी जिनपिंग यांच्या दुसऱया कार्यकाळातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण योजनेत याचा समावेश होतो. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये राहणाऱया गरिबांना सरकारी अनुदानाच्या मदतीने निर्माण केल्या जाणाऱया घरांमध्ये हलविले जाईल.

2016-2020 या कालावधीत चीनच्या 22 प्रांतांमधून एकूण 98.10 लाख लोकांना त्यांच्या घरातून दुसरीकडे हलविले जाईल. काही जणांना शहरी भागांमध्ये निर्मिलेल्या घरांमध्ये हलविण्यात येईल तर इतरांना समृद्ध ग्रामीण भागात वसविले जाणार आहे. या योजनेद्वारे 3 कोटी लोकांना दारिदय़्ररेषेच्या वर आणता येईल अशी चीनला अपेक्षा आहे. 

1980 नंतर वेगवान आर्थिक विकासाच्या मदतीने चीनने गरिबीचे प्रमाण घटविण्यास यश मिळविले आहे. परंतु संयुक्त राष्ट्राच्या नव्या अहवालानुसार 2016 मध्ये चीनची किमान 5.7 टक्के ग्रामीण लोकसंख्या दारिदय़्ररेषेखाली जगत आहे. चीनच्या पश्चिमेच्या भागांमध्ये हा आकडा 10 टक्के आणि अल्पसंख्याक समुदायांमध्ये 12 टक्क्यांपर्यंत आहे.

चीनचा सर्वात गरीब प्रांत क्वईचोने जवळपास 3600 नव्या ठिकाणांवर साडेसात लाखांहून अधिक लोकांना हलविण्याचे लक्ष्य राखले होते. गांसू, सछवान आणि ग्वांसी प्रांतामधून 10 लाख लोकांना इतरत्र हलविण्याची तयारी आहे. युवान प्रांतातील 6 लाख 77 हजार लोकांना 2800 नव्या गावांमध्ये वसविण्याची तयारी सुरू आहे.

Related posts: