|Sunday, January 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ब्रह्मप्रकाश : भारताला अणुयुगात नेणारा शास्त्रज्ञ

ब्रह्मप्रकाश : भारताला अणुयुगात नेणारा शास्त्रज्ञ 

परदेशात राहून मानमान्यता मिळवणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं आपण ते केवळ भारतीय वंशाचे आहेत म्हणून कौतुक करतो. ते भारतात राहिले असते तर त्यांच्या कार्याचं एवढं कौतुक झालं नसतं. कारण इथल्या विद्यापीठांमधून आणि संशोधन संस्थांमधून जो सरंजामशाही कारभार आणि दुसऱयाचे श्रेय लाटण्याचे उद्योग चालतात, त्यामुळे त्या परदेशस्थित शास्त्रज्ञांना भारतात राहून कदाचित इथल्या राजकारणाला तोंड देता देता संशोधन करायला वावच मिळाला नसता. त्यामुळेच भारतात राहून देशहिताचं संशोधन करणाऱया प्रसिद्धीशी फारकत घेतलेल्या शास्त्रज्ञांचं खूप कौतुक वाटतं. ब्रह्मप्रकाश हे अशा भारतीय राहिलेल्या शास्त्रज्ञांपैकी एक, त्यांचा स्मृतिदिन जानेवारी महिन्यात असतो म्हणून हा खटाटोप.

ब्रह्मप्रकाश यांचा जन्म 21 ऑगस्ट 1912 या दिवशी लाहोर इथं झाला. त्यांचे वडील जोधाराम शेखरी हे भारतीय रेल्वेत कामाला होते. मुलानं शिकून मोठं व्हावं, ही त्यांची इच्छा होती. ब्रह्मप्रकाश यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण लाहोर इथं पार पडलं. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत कायम पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याचा वसा सोडला नाही. लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते त्याच महाविद्यालयात प्रयोगदर्शक म्हणून काम करू लागले. इथेच त्यांनी एच. बी. डनीक्लिफ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर ब्रह्मप्रकाश शांतीस्वरूप भटनागर यांच्या संपर्कात आले. त्यांच्या बरोबरच्या संशोधनातून ब्रह्मप्रकाश यांचे लक्ष संक्रमणी मूलद्रव्यांकडे (ट्रांझिशन मेटल्स) वळले. ते संक्रमणी धातूंच्या संयुगाच्या चुंबकीय गुणधर्मांचा अभ्यास करू लागले.

त्या काळात त्यांनी क्रोमियम या धातूवर लक्ष एकवटलं होतं. ब्रह्मप्रकाशांनी क्रोमियम या धातूची अनेक नवनवी संयुगे तयार केलीच. पण या संयुगांमधील क्रोमियमची सायुज्यता (व्हॅलन्सी) सुद्धा निश्चित केली. त्यांनी पंजाब विद्यापीठात संशोधन करून 1942 साली पीएचडी मिळवली. डॉक्टरेट मिळवल्यावर ते पुढील संशोधनासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेस रवाना झाले. आधी ते कोलंबिया विद्यापीठात गेले, पण तिथे त्यांना ज्या विषयात रस होता, त्या विषयात संशोधनाची सोय नाही, हे लक्षात येताच ते मॅसॅच्युसेटस् इन्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत दाखल झाले. इथे त्यांनी धातूशास्त्र विभागात संशोधन सुरू केले. एमआयटीमध्ये ब्रह्मप्रकाश यांना त्या काळातील ख्यातनाम धातुशास्त्रज्ञांबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. जॉन चिपमन, मॉरीस कोटेन, ए. एम. गॉडिन आणि राइनहार्ट शूमन (धाकटे) अशा धातूशास्त्रज्ञांबरोबर काम करताना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्यांना खनिज शुद्धीकरण या विषयातल्या संशोधनाबद्दल एमआयटीनं ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदव्युत्तर संशोधनातील महत्त्वाच्या कार्याचा सन्मान म्हणून देण्यात येणारी पदवी बहाल केली. यानंतरच्या काळात त्यांना अमेरिकेत मानाच्या अनेक नोकऱया मिळू शकल्या असत्या. पण त्यांनी 1949 मध्ये भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ते भारतात परतल्यावर एस.एस. (शांतीस्वरूप) भटनागर यांनी होमी भाभांकडे ब्रह्मप्रकाश यांच्या नावाची शिफारस केली.

होमी भाभा यावेळी भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी करीत होते. त्यांना या प्रकल्पात काम करण्यासाठी बुद्धिमान संशोधकांची गरज होतीच. त्यांनी ब्रह्मप्रकाश यांना धातूशास्त्र विभागात ‘शास्त्रज्ञ’ या पदावरू रूजू होण्यास सांगितले. त्यावेळी या प्रकल्पाची प्राथमिक जुळवाजुळव सुरू होती. त्यामुळे ब्रह्मप्रकाश यांना बेंगळुरस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक म्हणून सामावून घ्यावं आणि तिथे त्यांनी धातूशास्त्र विभागाला उभारी द्यावी, असं ठरलं. तेव्हा ब्रह्मप्रकाशांनी या संस्थेत धातूशास्त्राचा विभागप्रमुख म्हणून काम सुरू केलं. या विभागाचे प्रमुखपद प्रथमच एका भारतीयाकडं आलं होतं. ब्रह्मप्रकाश बेंगळुरमध्ये सहा वर्षे होते. त्या काळात त्यांनी या विभागाला जगाच्या नकाशावर नेलं. इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या धातूशास्त्र विभागात चांगल्या शिकवण्याबरोबरच अव्वल दर्जाचं संशोधनही होऊ लागलं.

1957 मध्ये ब्रह्मप्रकाश मुंबईत त्यांच्या मूळ विभागात म्हणजे भारतीय अणुऊर्जा प्रकल्पात रूजू झाले. त्यावेळी सायरस या कॅनेडियन, इंडियन रिसर्च रिऍक्टरची म्हणजे कॅनडाच्या मदतीनं उभारलेला आण्विक संशोधन प्रकल्पाच्या उभारणीची तयारी चालू होती. तिथे ऍल्युमिनियमचे आवरण असलेले युरेनियमचे दांडे तयार करण्याची जबाबदारी ब्रह्मप्रकाश यांच्यावर सोपविण्यात आली होती. कॅनडाशी केलेल्या करारानुसार या प्रकल्पासाठी निम्मे इंधन भारताने पुरवायचे होते. अणुभट्टीत वापरायचे युरेनियम हे खूप काळजीपूर्वक तयार करावे लागते. त्याचे सर्व कण अगदी बारीक पण शक्यतो आकारानं एकसारखे असावे लागतात. ब्रह्मप्रकाश आणि त्यांच्या सहकाऱयांनी ही जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पेलली. त्यांनी तयार केलेले इंधन कॅनडानं पुरविले. जे इंधनापेक्षाही चांगले ठरले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आण्विक समूहाचे लक्ष भारतीय वैज्ञानिकांकडे वेधले गेले.

त्यानंतर ब्रह्मप्रकाश यांच्यावर एक नवी जबाबदारी सोपविण्यात आली. कॅनडाच्या मदतीनेच राजस्थानातील कोटा इथं जो उर्जा प्रकल्प उभारण्यात येत होता, त्यासाठी लागणारे इंधनदांडू करणे. ब्रह्मप्रकाश आणि त्यांच्या सहकाऱयांनी युरेनियम डाय ऑक्साईडच्या इंधन दांडूंवर झिर्कोनियमच्या मिश्र धातूंचे आवरण लेपण्यात यश मिळवले. यानंतर आण्विक इंधन बनविण्याचे केंद्र ब्रह्मप्रकाश यांनी प्रस्थापित केले. इथे संशोधन आणि ऊर्जा प्रकल्पासाठी आण्विक इंधनांचे वेगवेगळे प्रकार बनविणे शक्य झाले. त्यामुळे वापरलेल्या इंधनातून निर्माण होणारे प्लुटोनियम वेगळे करणे आणि त्याला इंधन योग्य बनविणे शक्य झाले होते.

ब्रह्मप्रकाश यांच्यावर होमी भाभांचा ठाम विश्वास बसला होता. त्याचा परिणाम म्हणजे भाभांनी तुर्भे येथे ब्रह्मप्रकाश यांच्यावर एकाचवेळी अनेक जबाबदाऱया टाकल्या होत्या. ब्रह्मप्रकाश यांच्या हाताखाली धातूशास्त्र विभागात काम करणारा शास्त्रज्ञांचा गट हा तुर्भे येथील प्रयोगशाळा संकुलात काम करणारा सर्वात मोठा गट होता. त्यात फक्त धातूशास्त्रज्ञच संशोधन करीत होते, असंही नाही. तर रसायनशास्त्राच्या विविध शाखातले तज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत होते. याशिवाय अणुभट्टीची अभियांत्रिकी जबाबदारी आणि संचलन, समस्थली (आयसोटोप) निर्मिती आणि त्यांचे व्यावहारिक उपयोग याशिवाय अभियांत्रिकी सेवा आदी जबाबदाऱया ब्रह्मप्रकाश यांच्या कार्यकुशलतेवर भरवसा ठेवून भाभांनी त्यांच्यावर सोपवल्या होत्या आणि त्या ब्रह्मप्रकाश यांनी यशस्वीपणे सांभाळून होमी भाभांचा त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवून दाखवला होता.

1967 मध्ये ब्रह्मप्रकाश यांच्यावर नव्याने निर्माण झालेल्या युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली. 1981 मध्ये ते या संस्थेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. 1966 ते 1972 दरम्यान ते हैद्राबाद येथील अणुइंधन संकुलाचे प्रकल्प संचालक म्हणून काम बघत होते. तरीही जदुगुडा येथील युरेनियम प्रकल्पावर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळेच या दोन्हीही संस्था भक्कम पायावर उभ्या राहिल्या. सतीश धवन यांनी ब्रह्मप्रकाश यांच्यावर आणखी एक जबाबदारी टाकली, ती म्हणजे त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरची उभारणी. इथेही ब्रह्मप्रकाश यांचे नेतृत्वगुण दिसून आले. इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची) व्हीएसएससी ही आघाडीची संस्था मानली गेली. इथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन, (थुंबा विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्र) अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्र, अग्निबाण इंधन प्रकल्प, अग्निबाण निर्मिती केंद्र अशा विविध प्रकल्पाचं एकत्रित कार्य ब्रह्मप्रकाश यांच्या नेतृत्वामुळं सुविहीतपणे पार पडू लागलं. ब्रह्मप्रकाश यांनी विक्रम साराभाई यांनी बघितलेलं स्वप्न साकार केलं, असं त्यांच्या या कार्याबद्दल म्हटलं जातं. ब्रह्मप्रकाश यांना असंख्य सन्मान आणि पुरस्कारप्राप्त झाले. या कर्मयोग्याचे 1984 च्या वर्षारंभी 3 जानेवारीस मुंबई मुक्कामी निधन झाले आणि भारताच्या विज्ञान क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला.

Related posts: