|Friday, January 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सामाजिक ऐक्याची घडी विस्कटली!

सामाजिक ऐक्याची घडी विस्कटली! 

सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार अशा विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करणारा महाराष्ट्र हा देशासाठी नेहमीच आदर्श उदाहरण ठरला आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित बनू पाहत आहे. कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने दलित समाजाचा उद्रेक झाला. या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याची घडी पुन्हा एकदा विस्कटली. महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमिकेला पुन्हा एकदा बट्टा लागला.

 

पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची संपूर्ण देशाला ओळख आहे. संतांची आणि समाज सुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने नेहमीच सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समता, संघर्षाचा झंझावात महाराष्ट्रातून सुरू होऊन त्याने देश व्यापला. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार अशा विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करणारा महाराष्ट्र हा देशासाठी नेहमीच आदर्श उदाहरण ठरला आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित बनू पाहत आहे. समाजातील सौहार्द बाजूला राहून त्याची जागा आता संशयाने घेतली आहे. एक समाज घटक दुसऱया घटकाकडे संशयाने पाहू लागला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाने पेटलेला वणवा थंडावला असताना गेल्या आठवडय़ात कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने दलित समाजाचा उद्रेक झाला. या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याची घडी पुन्हा एकदा विस्कटली. महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमिकेला पुन्हा एकदा बट्टा लागला. लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकारण्यांनी जातीय धुवीकरणाचा खेळ पुन्हा एकदा खेळायला सुरुवात केली काय? अशी शंका वाटू लागली आहे.

पुणे जिल्हय़ातील कोरेगाव-भीमा येथे 1818 मध्ये इंग्रज आणि दुसरे पेशवे यांच्यात लढाई झाली. या लढाईत इंग्रजांच्या बाजूने शूद्र समाज लढला. मूठभर शूद्रांनी पेशव्यांचा पाडाव केला. या विजयाची आठवण म्हणून इंग्रजांनी 1821 मध्ये कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये विजयस्तंभाला भेट देऊन अस्पृश्य समाजाची शौर्यगाथा नव्याने समोर आणली. त्यानंतर साधारणत: 1990 पासून दलित समाजाच्या अतुलनीय शौर्याचे प्रतीक ठरलेल्या कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभाला दरवर्षी हजारो आंबेडकर अनुयायी मानवंदना देतात. यावर्षी कोरेगाव-भीमाच्या लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली म्हणून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, या उत्साहाला जातीयवाद्यांनी गालबोट लावले. नववर्षातील पहिल्या दिवसाची प्रसन्न सकाळ अनुभवली जात असताना कोरेगाव-भीमापासून काही अंतरावर समाजकंटकांनी हैदोस घातला. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक केली. त्यांच्या गाडय़ांची तोडफोड करण्यात आली. या धुमश्चक्रीत मराठा समाजातील 28 वर्षाच्या राहुल फटांगळे या तरुणाचा मृत्यू झाला. जातीयवाद्यांच्या या कृत्यामुळे महाराष्ट्र सलग तीन दिवस तणावात होता. राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करून या तणावात आणखी भर घातली.

कोरेगाव-भीमाच्या दंगलीचे नेमके कारण काय? याचा शोध न घेता आंबेडकरवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.  मात्र, घटनाक्रम लक्षात घेतला तर कोरेगाव-भीमाची दंगल पूर्वनियोजित वाटते. 28 डिसेंबरला वढू बदुक येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीची तोडफोड झाली. अस्पृश समाजातील गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्याची आठवण म्हणून वढू बद्रुकमध्ये गायकवाड यांची समाधी बांधण्यात आली आहे. 29 डिसेंबरला या समाधीशी संबंधित फलक काढण्यात आला. या घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पुण्याला 31 डिसेंबरला शनिवारवाडय़ावर संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी आघाडी आणि जातीमुक्त आंदोलन या संघटनांनी एकत्र येत एल्गार परिषद घेतली. परिषदेत दलितांमधून नव्याने उदयाला आलेले नेतृत्व जिग्नेश मेवाणी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खलिद यांची भाषणे झाली. या दोघांच्या प्रक्षोभक भाषणाची परिणती कोरेगाव-भीमाच्या दंगलीत झाल्याचे हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे आहे. तर भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि संपूर्ण आंदोलनाची सूत्रे हातात ठेवणारे प्रकाश आंबेडकर यांनी दंगली भडकवण्यामागे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे असल्याचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि एकबेटे या दोघांविरोधात एफआयआर दाखल केला. एफआयआरनंतर दोघांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. आंबेडकर यांनी अटकेच्या कारवाई शिवाय महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होणार नाही, असा इशारा दिला आहे. तर एफआयआर मागे घ्यावा म्हणून सांगलीमध्ये भिडे गुरुजी समर्थकांनी मोर्चा काढला. 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदच्या दिवशी कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी हिंसक आंदोलनाच्या विरोधात प्रतिमोर्चा काढला. या आंदोलन-प्रतिआंदोलनातून दलित आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. इतिहासाची मोडतोड करून सोयीचा भाग लोकांसमोर आणून भावना भडकवायच्या हा काहींचा उद्योग असतो. कोरेगाव-भीमाची दंगल हा या नसत्या उद्योगाचा परिणाम आहे. जातीयवाद्यांची ही खेळी ओळखून जनतेने सावध राहिले तर सामाजिक सौहार्दाला नख लावणाऱया घटनांची पुनरावृत्ती टळू शकते.

गृह खात्याचे अपयश

कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी होईल. चौकशीत दोषी कोण? घटनेच्या मुळाशी नेमका कोणाचा हात आहे? हे स्पष्ट होईल. मात्र, गृह खाते सांभाळणाऱया मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण टाळणे शक्य होते. कोरेगाव-भीमाच्या सोहळय़ाची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. दलित समाजात सोशल मीडियावरून तसा संदेश फिरत होता. या संदेशला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववाद्यांकडून निषेधाचा संदेश फिरवला जात होता. शौर्यदिनाच्या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कोरेगाव-भीमाला मोठय़ा संख्येने भीमसैनिक जमणार हे स्पष्ट होते. 28 आणि 29 डिसेंबरला वढू बद्रुकमध्ये घडलेल्या घटना लक्षात घेऊन कोरेगाव-भीमा परिसरात प्रशासनाने योग्य तो पोलीस फौजफाटा ठेवायला हवा होता. परंतु, पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. त्यामुळे कोरेगाव-भीमाची घटना ही गृह खात्याचे अपयश मानले पाहिजे. मराठा आंदोलन यशस्वीपणे हाताळणाऱया मुख्यमंत्र्यांना कोरेगाव-भीमाची तीव्रता उशीरा लक्षात आली. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार असताना 11 जुलै 1997 साली घाटकोपरच्या रमाबाईनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची विटंबना झाली. त्यानंतरच्या उद्रेकात गोळीबार होऊन 10 भीमसैनिक शहीद झाले. त्यावेळी दलित समाजात निर्माण झालेल्या उद्रेकाचा सर्वाधिक फटका हा शिवसेना-भाजपला बसला होता. 1998 मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत भाजप-सेनेचा महाराष्ट्रातून पुरता सफाया झाला. याशिवाय 1999 च्या विधानसभा निवडणुकीत युतीला सत्ता सोडावी लागली. मुख्यमंत्र्यांनी हा राजकीय इतिहास लक्षात ठेवायला हवा.

Related posts: