|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » किनारपट्टी संवर्धनावर गुजरात येथे बैठक

किनारपट्टी संवर्धनावर गुजरात येथे बैठक 

डॉ. सारंग कुलकर्णींना निमंत्रण

वार्ताहर / मालवण:

सागरी पर्यटनाच्या माध्यमातून गुजरातला किनारपट्टीचे संरक्षण व संवर्धन व्हावे  तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यावरण मंत्रालयाने गांधीनगर येथे 12 व 13 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून सागरी विश्व पर्यटकांना खुले करणारे सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांना गुजरात सरकारने या बैठकीला मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले आहे. ते बैठकीत सागरी पर्यटनविषयक नवीन संकल्पना मांडणार आहेत.

डॉ. कुलकर्णी यांनी मालवण किनारपट्टीवरील सागरी पर्यटनाद्वारे पर्यटनाचे  अनोखे विश्व सर्वांसमोर आणले. स्नार्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पाण्याखालचे विलोभनीय विश्व पर्यटकांना पाहता येऊ लागले. स्नॉकलिंग व स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक मालवण किनारपट्टीवर येऊ लागले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटक स्कुबा व स्नॉकलिंगचा आनंद लुटण्यासाठी जातात. त्यामुळे साहजिकच मालवण किनारपट्टीवरील पर्यटन बहरले. स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून किनारपट्टीवरील स्थानिक युवकांना रोजगाराचे साधन निर्माण झाले.

पर्यटनाच्या माध्यमातून देशाला दिशा

डॉ. कुलकर्णी म्हणाले, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गांधीनगर येथे बैठकीचे आयोजन केले आहे. सागरी पर्यटनाच्या माध्यमातून गुजरातच्या किनारपट्टीचे संरक्षण, संवर्धन व रोजगार विषयावर चर्चा होणार आहे. सागरी पर्यटनातून भारताला कशा पद्धतीने दिशा मिळेल, यावरही चर्चा केली जाणार आहे. बैठकीला किनारपट्टीवरील राज्यांतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जगभरातील अन्य सहा शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे.

नवीन संकल्पना मांडणार

सारंग कुलकर्णी म्हणाले, मालवण किनारपट्टीवरील पर्यटन स्नॉकलिंग व स्कुबा डायव्हिंगमुळे बहरले. पर्यटनाबरोबर अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे सागरी पर्यटनाच्या ‘मालवण मॉडेल’ची जगभरात खूप चर्चा झाली. गांधीनगर येथील बैठकीत सागरी पर्यटनविषयक नवनवीन संकल्पना मांडणार आहोत. यात किनारपट्टीचे संरक्षण, संवर्धन व या संवर्धनातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

Related posts: