|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » तरंगत्या हॉटेलचे स्वप्न ‘पाण्यात’

तरंगत्या हॉटेलचे स्वप्न ‘पाण्यात’ 

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील समुद्रात तरंगते (फ्लोटिंग) हॉटेल बांधण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जेट्टी उभारण्यासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या हॉटेल मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी नाकारली. हेरीटेज समितीने मुंबई समुद्रतटाची सुरक्षा महत्वाचे असल्याचे स्पष्ट करत त्या निर्णयाला योग्य ठरवत उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली.

अरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारून पर्यटकांना स्पीड बोटद्वारे नेण्याकरिता नरिमन पॉइंट येथील एनसीपीएजवळ फ्लोटिंग जेट्टी उभारण्यासाठी रश्मी डेव्हलपर्स आणि एमटीडीसीने पालिकेकडे परवानगी मागितली होती. पालिकेने विरोध दर्शवल्यानंतर रश्मी डेव्हलपर्सने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. जागतिक आणि अनोखे महत्त्व असलेल्या मरिन ड्राइव्ह परिसरात कोणतेही काम करायचे असल्यास मुंबई पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त आणि मुंबई पुरातत्व संवर्धन या तिघांच्या उच्चस्तरीय समितीच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाहीत, असे शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्या. अभय ओक आणि न्या. पी. देशमुख यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. वेळेअभावी खंडपीठाने निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला होता. सोमवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान प्रस्तावित हॉटेल हे मरिन ड्राईव्ह परिसरात असून त्याच्या आजुबाजूला अनेक महत्त्वाची ठिकाणे आणि कार्यालये आहेत. तसेच नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने परवानगी देताना सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता याकडे न्या. ओक यांनी लक्ष वेधले. प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह परिसरात येणाऱया वाहनांची संख्या वाढेल आणि त्यामुळे ट्राफिकची समस्या निर्माण होईल. या कारणामुळे त्रिसदस्यीय समितीने ही परवानगी नाकारली होती. मरिन ड्राईव्हबाबतीत कोणताही निर्णय या समितीच्या परवानगीशिवाय घेतला जाऊ शकत नाही. असे पुन्हा स्पष्ट करत न्यायालयाने फ्लोटिंग हॉटेलसाठी मरीन ड्राईव्हवर जेट्टी उभारण्यासाठी परवानगी नाकारली.

काय आहे प्रकरण

रश्मी डेव्हलपर्स कंपनीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत पर्यटनवाढीला चालना मिळण्यासाठी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली. प्रकल्पाद्वारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करून महसूल मिळवण्याचा त्यांचा उद्देश होता. एनसीपीएजवळ मरिन ड्राइव्हच्या टोकाला समुद्रात शंभर मीटर लांबीची जेट्टी उभारायची आणि तिथून पुढे पर्यटकांना स्पीड बोटीतून ‘फ्लोटेल’ या पंचतारांकित हॉटेलपर्यंत नेण्याची सोय करायची अशी सदर प्रकल्पाची योजना होती.