|Sunday, June 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘पद्मावत’ चित्रपटाला राजस्थानमध्ये बंदीच

‘पद्मावत’ चित्रपटाला राजस्थानमध्ये बंदीच 

राज्य सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था/ जयपूर

प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱयात सापडलेल्या पद्मावत चित्रपटालाच राजस्थानमध्ये बंदीच असेल, असे सोमवारी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी जाहीर केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पद्मावती चित्रपट हा इतिहासाची मोडतोड करणार आहे. यामध्ये रजपूत समाजाचा अवमान करण्यात आला आहे, असा दावा करत राजस्थानमध्ये चित्रपट प्रदर्शित करणारे सिनेमागृह उद्ध्वस्त केले जातील, अशी धमकी राजपूत करणी सेनेच्या वतीने यापूर्वीच दिली आहे.

 पद्मावती हा चित्रपट 1 डिसेंबर 2017 प्रदर्शित होणार होता. मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातली. सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटासाठी विशेष समिती स्थापन केली होती. यामध्ये इतिहास तज्ञांसह राजस्थानमधील राजघराण्यांतील सदस्यांचा समावेश होता. या समितीने चित्रपटातील पाच दृश्यांसह नावातही बदल करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार 25 जानेवारी रोजी हा चित्रपट आता पद्मावत नावाने देशभर प्रदर्शित होणार आहे. राजस्थानमधील तीव्र विरोध पाहता मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चित्रपट प्रदर्शनाला यापूर्वीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तो कायम असून नाव बदलले असेल तरी हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होणार नाही, असे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी स्पष्ट केले.