|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » युवा भारत संघाचा द.आफ्रिकेवर विजय

युवा भारत संघाचा द.आफ्रिकेवर विजय 

यू-19 विश्वचषक स्पर्धा : सराव सामन्यात 189 धावांनी मात

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

बंगालचा युवा वेगवान गोलंदाज इशान पोरेलने मिळविलेल्या चार बळींच्या आघारे भारताच्या यू-19 संघाने विश्वचषकपूर्व सराव सामन्यात दक्षिण आफ्रिका युवा संघावर 189 धावांनी दणदणीत विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी करणाऱया भारत युवा संघाने 50 षटकांत 8 बाद 332 धावा फटकावल्या. यात आर्यन जुयल (86) व हिमांशू राणा (68) यांच्या अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानंतर द.आफ्रिका युवा संघाचा डाव 38.3 षटकांत केवळ 143 धावांत गुंडाळून भारत युवा संघाने मोठा विजय साकार केला. पोरेलने द.आफ्रिका युवा संघाची आघाडी फळी मोडून काढताना 8 षटकांत 23 धावांत 4 बळी मिळविले.

प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ (16) व मनजोत कालरा (31) यांनी 54 धावांची अर्धशतकी सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. अखोना मन्याकाने शॉ व शुभम गिल यांना दोन चेंडूंच्या फरकाने बाद केले. 10 चेंडूनंतर त्याने कालराचा बळीही मिळविला. आर्यन व हिमांशू यांनी डाव सावरताना अनुक्रमे 92 व 69 चेंडूंच्या खेळीत प्रत्येकी 8 चौकार व एक षटकार ठोकला. 333 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करणाऱया द.आफ्रिका युवा संघाला स्थिरावण्याची संधीच मिळाली नाही. ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. जीन डु प्लेसिसने संघातर्फे एकमेव अर्धशतक नोंदवले. त्याने 82 चेंडूत 50 धावा केल्या. 38 व्या षटकात त्याला शिवा सिंगने पायचीत केले. शिवाने 9 धावांत 2, कमलेश नागरकोटीने 15 धावांत 2, अभिषेक शर्माने 16 धावांत 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : यू-19 भारत 50 षटकांत 8 बाद 332 (आर्यन जुयल 86, हिमांशू राणा 68, अखोना मन्याका 3-40), यू-19 द.आफ्रिका 38.3 षटकांत सर्व बाद 143 (जीन डु प्लेसिस 50, जिवेशन पिल्ले 29, इशान पोरेल 4-23, शिवा सिंग 2-9).