|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » निर्णय होत नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार

निर्णय होत नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार 

प्रतिनिधी / इचलकरंजी

येथील यंत्रमाग कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार नेते व प्रांताधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यात प्रांतकार्यालयात मंगळवारी बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी प्रांतकार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारून बसलेल्या कामगारांना येत्या आठ दिवसात मजूरी वाढीसंदर्भात कामगार आयुक्तांना अहवाल सादर करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पण कामगारांनी जोपर्यंत निर्णय होत नाही, तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे 1 जानेवारी पासून सुरू असणारे यंत्रमाग कामगारांचे कामबंद आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच राहिले.

येथील राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या वतीने यंत्रमाग कामगारांचे 2016-17 पासूनच्या महागाई भत्त्याची 9 पैसे मजूरीवाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी 1 जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्या कामगारांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. थोरात चौक येथून सुरू झालेल्या या मोर्च्यात सुमारे दिड हजारहून अधिक कामगारांचा सहभाग होता. येथील प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात उपस्थित कामगारांसमोर कामगारनेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे शिष्ट मंडळाची प्रांताधिकारी समीर शिंगटे व सहाय़क कामगार आयुक्त गुरव यांच्याशी प्रांतकार्यालयात दुपारी बैठक झाली. यावेळी श्री. गुरव यांनी 28 फेबुवारी 2013 च्या संयुक्त करारानुसार 1 जानेवारी 2017 ची 3 पैसे व 1 जानेवारी 2018 ची 3 पैसे मजुरीवाढीचा प्रस्ताव राज्याचे कामगार मंत्री व कामगार आयुक्त यांची शिफारस घेवून लागू करण्याचा प्रयत्न करू असे सांगीतले. यावेळी उपस्थित शिष्टमंडळातील काही प्रतिनिधींनी यामध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे सांगीतले. राष्ट्रवादी कामगार संघटनेचे नेते मिश्रीलाल जाजू यांनी या प्रस्तावाला आम्ही न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला. सुमारे एक तास झालेल्या या बैठकीत  दोन्ही बाजूंनी समझोता करत कामगार संघटनेच्या प्रतिनिधिंनी याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगारांसमोर या गोष्टींचा खुलासा करावा अशी विनंती केली. दरम्यान या चर्चेमध्ये गावभाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी दोन्ही बाजूंनी समन्वयाने हा प्रश्न संपवण्याची विनंती केली.

अनिल गुरव यांनी प्रांतकार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारून बसलेल्या कामगारांना येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पण आक्रमक झालेल्या कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या या विनंतीला धुडकावून लावत जोपर्यंत निर्णय दिला जात नाही तो पर्यंत कामबं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून सुरू असणारा यंत्रमाग कामगारांचे कामबंद आंदोलन संपुष्टात आले नाही.

Related posts: