|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘इस्त्रो’च्या अध्यक्षपदी के. सिवान यांची वर्णी

‘इस्त्रो’च्या अध्यक्षपदी के. सिवान यांची वर्णी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अध्यक्षपदी प्रख्यात शास्त्रज्ञ के. सिवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिवान यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या जागेवर आता सिवान यांची वर्णी लागणार आहे. मंत्रिमंडळ समितीने आगामी तीन वर्षांसाठी सिवान यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविल्याची माहिती बुधवारी सायंकाळी देण्यात आली. सिवान हे सध्या विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 1980 मध्ये मद्रास इन्स्टिटय़ूट ऑक टेक्नॉलॉजी या संस्थेतून एरॉनॉटिकल इजिनिअरींगची पदवी संपादन केलेली आहे. तर 1982 मध्ये आयआयएससी बेंगळूर येथून अवकाश संशोधनातील पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. तसेच 2006 मध्ये त्यांनी आयआयटी पवई येथून अवकाश संशोधनातील पीएचडी पदवीही प्राप्त केली आहे.

सिवान यांनी 1982 मध्ये इस्त्रो या संस्थेत प्रवेश केला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी पीएसएलव्ही प्रकल्पासह विविध नव्या मोहिमांचे नियोजन, आखणी आणि परीक्षण यात त्यांनी हातभार लावलेला आहे. अवकाश संशोधनातील यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.