|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रेठरेहरणाक्ष जवळ डंपर अपघातात दोघेजण ठार

रेठरेहरणाक्ष जवळ डंपर अपघातात दोघेजण ठार 

प्रतिनिधी / इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील संभाजीनगर परिसरात डंपर शौचलयावर धडकून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी 09 जानेवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास झाला. शौचालय हे घरगुती असून शौचालयावरच धडक बसल्याने मोठा अनर्थ टळला.

दीपक उर्फ संदेश परशुराम पतंगे (26, रा. तुपारी) व राजेंद्र उर्फ बाळू शामराव पाटील (45, रा. दह्यारी) असे मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. दीपक हा दुधारी येथील बाबासाहेब शामराव मरळे यांच्या डंपर (क्र.एम.एच.09 बी.ए. 5294) वर चालक होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता चालक दीपक हा आपले मित्र अक्षय सुरेश पाटोळे (19) राजकुमार शामराव पाटील, अशोक शामराव टोपकर (तिघेही रा. दह्यारी) यांना बरोबर घेवून कराड येथे डंपरचे किरकोळ काम करण्यासाठी गेला होता. ते काम उरकून कराडहून ताकारीकडे येत होते. रेठरेहरणाक्ष गावाच्या हद्दी दरम्यान संभाजीनगर येथे पुलाचे काम सुरु आहे. येथून दीपक हा डंपर उजव्या बाजूने घेत असताना त्याचा ताबा सुटल्याने डंपर समोरील शौचालयावर जावून धडकला.

या झालेल्या जोराच्या धडकेत चौघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील राजकुमार पाटील व अशोक टोपकर यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. तर डंपर चालक दीपक व अक्षय पाटोळे या दोघांना इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल येथे आणण्यात आले. उपचारा दरम्यान चालक दीपक पतंगे व राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. चालक पतंगे विरुध्द इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.