|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘मार्शल आर्ट’ मनुष्याला कणखर बनवते!

‘मार्शल आर्ट’ मनुष्याला कणखर बनवते! 

सिंधुदुर्गनगरीत तायकान्दो कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन :    

क्रीडा प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

 मार्शल आर्ट म्हणजेच कराटे ही एक अशी साधना आहे, जी माणसाला शारीरिकदृष्टय़ा सक्षम बनवतेच. पण त्यापेक्षाही अधिक ती मानसिकदृष्टय़ा अतिशय कणखर बनवते. मार्शल आर्टमुळे निर्भिडपणा, स्वयंशिस्त, भिडण्याची वृत्ती, प्रचंड आत्मविश्वास व संयम आदी महत्वपूर्ण गुण आपोआपच अंगी बाणवतात. आयुष्याला निर्भिडपणे सामोरे जायचे असेल, तर मार्शल आर्टची साधना कराच, असे प्रतिपादन माजी राष्ट्रीय कराटेपटू आणि पत्रकार शेखर सामंत यांनी केले.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेने आणि तायकान्दो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या सहकार्याने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात तायकान्दो मार्शल आर्टचा प्रशिक्षणवर्ग सुरु करण्यात आला. या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी क्रीडाधिकारी मनिषा पाटील, तायकान्दो असो. ऑफ सिंधुदुर्गचे सचिव व राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी, संघटनेचे कोषाध्यक्ष सुधीर राणे, पदाधिकारी विनायक सापळे, नितिन तावडे, जयश्री कसालकर, अक्षय कुलकर्णी, अक्षय सावंत आदी उपस्थित होते.

मनिषा पाटील म्हणाल्या, केवळ कराटेच नव्हे, तर येत्या काही दिवसात या क्रीडा केंद्रात विविध खेळांचे प्रशिक्षणवर्ग सुरू करुन या क्रीडाकेंद्राला उर्जितावस्ता देण्याचा प्रयत्न आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू घडवण्याचा आमचा मानस आहे. तायकान्दो प्रशिक्षण वर्गामुळे पंचक्रोशीतील शाळांना याचा फायदा होईल, असे त्या म्हणाल्या. शनिवार व रविवार असे आठवडय़ातील दोन दिवस प्रशिक्षण चालणार असल्याची माहिती प्रशिक्षक केळुसकर यांनी दिली.

Related posts: