|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आता कामगार नोंदणी होणार थेट पाच वर्षांसाठी

आता कामगार नोंदणी होणार थेट पाच वर्षांसाठी 

बांधकाम मंडळाच्या बैठकीत निर्णय

शासनाच्या मान्यतेनंतर होणार प्रत्यक्षात अंमलबजावणी

प्रतिनिधी / मालवण:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाखाली नोंदणी ही यापुढे पाच वर्षांसाठी होणार असून पाच वर्षांनंतर नूतनीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला एक रुपयाप्रमाणे पाच वर्षांचे 60 रुपये भरून नोंदणी करण्याचा निर्णय 3 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघ जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांनी दिली.

बांधकाम मंडळाची बैठक कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी कामगार आयुक्त पोयाम, मंडळ सचिव सारंगम, भारतीय मजदूर संघाचे मंडळ सदस्य श्रीपाद कुटास्कर, वेदा आगटे व अन्य अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी बांधकाम कामगारांकडून एका वर्षासाठी नोंदणी वर्गणी 60 रुपये भरून दरवर्षी ओळखपत्राचे नूतनीकरण करावे लागत होते. परंतु भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार आता फक्त 60 रुपये भरून पुढील पाच वर्षांसाठी तो बांधकाम कामगार म्हणून मंडळाजवळ नोंदीत राहणार असून पाच वर्षांनंतर पुन्हा नूतनीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांची अनेक कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियेतून सुटका झाली आहे.

बक्षीस म्हणून 5000 रु. मिळणार

 भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नोंदीत बांधकाम कामगाराने भाग घेऊन प्रशिक्षण घेतल्यास अशा कामगारांना बक्षीस म्हणून 5000 रुपये देण्यात यावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बांधकाम साहित्य खरेदीसाठी 5000 रु.

मंडळाजवळ नोंदीत असलेल्या कुटुंबातील एका कामगाराला बांधकाम साहित्य खरेदीसाठी 5000 रुपये अर्थसहाय्य वाटप करण्यात येत आहे. परंतु मंडळाच्या झालेल्या बैठकीत कुटुंबातील एक कामगार ही अट रद्द करून सर्व नोंदीत कामगारांना बांधकाम साहित्य खरेदीसाठी 5000 रुपये अनुदान मिळणार आहे.

घरकुल योजनेंतर्गत 2 लाख रुपये मिळणार

नोंदीत बांधकाम कामगार पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत सहभागी झाला असल्यास या बांधकाम कामगाराला बांधकाम मंडळाकडूनही 2 लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बँक व्याज मंडळ भरणार

एखाद्या नोंदीत बांधकाम कामगाराने बँकेच्या कर्ज योजनेंतर्गत घर घेतले असल्यास या कामगाराची बँकेच्या कर्जावरील व्याज रक्कम मंडळाकडून भरणा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

अनोंदीत कामगारांनाही मिळणार लाभ

एखादा बांधकाम कामगार असताना अपघाताने मृत्यू पावल्यास व तो कामगार मंडळाजवळ अनोंदीत कामगारास कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास मंडळाकडून दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मंडळाच्या 3 जानेवारी रोजी झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासनाच्या आदेशानंतरच होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

बांधकाम कामगारांची नोंदणी व्याप्ती वाढवणार

आज राज्यात मोठय़ा प्रमाणात इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार काम करीत आहेत. परंतु अद्यापही कामगार किंवा मालक नोंदणीसाठी पुढे येत नाहीत. खास करून सरकारी कामातील इमारत व इतर बांधकामांवर ठेकेदारामार्फत लावण्यात येणारे कामगार आज अनोंदीत आहेत. या कामगारांना नोंदणीचा लाभ मिळावा व नोंदणीची ही व्याप्ती वाढविण्यासाठी यापुढे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, कामगार कल्याण मंडळ, सहाय्यक कल्याण आयुक्त, कामगार विकास अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, कामगार विभाग, कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, कामगार अन्वेक्षक व दुकान निरीक्षक यांना नोंदणीचे अधिकार देऊन नोंदणीची व्याप्ती वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती हरी चव्हाण यांनी दिली.

Related posts: