|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणी माणूस हाताळायला सोपा

कोकणी माणूस हाताळायला सोपा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

कोणते प्रकल्प हवे की नको हे ठरवणे गरजेचे

परप्रांतीयांना जमिन विकणे बंद करा

प्रकल्पावरून प्रत्येकाचे सोयीचे राजकारण

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकणी माणूस सरकारच्या दृष्टीने हाताळायला अगदी सोपा झालाय, त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. कोणीही येऊन येथील माणसांची फसवणूक करताना दिसत आहे. राजकीय पक्षही एकमेकांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करून आपले भाव वाढवून घेत आहेत. परप्रांतीय येथे घुसून जमिनी खरेदी करतात तरीही आम्ही गप्पच, ही स्थिती आता सुधारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाचा वणवा पेटत आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून त्यावरून जोरदार राजकारणही उसळले आहे. या वातावरणात मनसेचे अध्यक्ष राजक ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा सुरू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी आगमन झाल्यानंतर ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ग्रीन रिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे शिष्टमंडळ आपणाला भेटल्याचे त्यांनी सांगितले.

विविध राजकीय पक्षांच्या भुमिकांबाबत बोलताना कोणी काय भुमिका घेतो याचे देणघेणं नसून स्थानिक जनतेला काय हवे हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक राजकीय पक्षांचे स्वतःचे अजेंडे असतात, भूमिका असतात, आपली भूमिका नाणार येथील स्थानिकांशी चर्चा करून मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पांना सुरूवातीला विरोध आणि नंतर हळूहळू समर्थन असा प्रकार नेहमी दिसतो. कोकणी माणूस आज सरकारच्या दृष्टीने हाताळायला सोपा झाला आहे. लोकांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा असे ठाकरे यांनी सांगितले आहे. आज परप्रांतातून लोक येताहेत, जमिनी विकत घेताहेत. कोकणातील लोकांनी ही गोष्ट बंद करायला हवी असे सांगितले. स्थानिक लोकांनी आता कठोर झाल्याशिवाय काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.

प्रकल्प येणार हे यांना माहित नव्हते का?

खासदार विनायक राऊत यांनी नाणार परिसरात गुजरातचे लॅण्ड माफियां घुसल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना त्यांना माहित असल्याशिवाय याठिकाणी प्रकल्प येतोय का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. एकमेकांवर ढकलायचे आणि आपले भाव वाढवून घ्यायचे असा प्रकार आहे. ही मंडळी काहीही सांगतात व लोकांना ते पटते. चलाख लोकांना याठिकाणी प्रकल्प येणार हे अगोदरच माहित होते, असे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.

भविष्यात धार्मिक दंगली घडविण्याचा घाट

सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांना आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडावी लागतेय हे लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक आहे. न्यायव्यवस्थेत सरकार किती हस्तक्षेप करतेय हे यावरून दिसून आले आहे. अडीच माणसे आज देश चालवत असून हे सर्व प्रकरण सरकारच्या अंगाशी येणार आहे. या न्यायाधिशांचा पत्रकारांसमोर येण्यापर्यंत असा काय कोंडमारा झाला? हे पाहणे गरजेचे आहे. यातून देश अराजकतेकडे वाटचाल करतो आहे. हे प्रकरण वाढणार असून यापुढे जातीय-धार्मिक दंगली घडवल्या जाण्याची भीती आहे. भीमा-कोरेगांव हा देखील एक प्लॅन होता. त्यासाठी जनतेते सावध होऊन या गोष्टींना बळी पडू नये असे राज ठाकरे यांनी सांगितले.

भाजपाला भरघोस मते पडणे हा प्रश्नच

प्रत्येक निवडणुकीत भाजप उमेदवार मोठय़ा संख्येने निवडून येतात. त्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले, गुजरात निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगही सरकार चालवतेय असे दिसून आले. एव्हीएम मशीन हॅक सारख्या गोष्टी सामोऱया आल्या आहेत. भाजपाला एवढी अचानक मते कशी पडू लागलीत हा एक प्रश्न असल्याचे राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Related posts: