|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर सीमेवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली

उत्तर सीमेवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली 

नवी दिल्ली:

 चीन जरी शक्तीशाली देश असला तरीही त्यांच्या अरेरावीला उत्तर देण्याची ताकत भारताकडे असल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. मात्र आता उत्तर सीमेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली असल्याचेही सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

चीनच्या अरेरावीला
उत्तर देण्याची भारताकडे ताकत

गेल्या वर्षभरातील चीनकडून होत असलेली आगळीक आणि कारवायांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. चीनजरी शक्तीशाली देश असला तरी भारताची ताकतही आता कमी राहिलेली नाही. चीनच्या प्रत्येक अरेरावीला उत्तर देण्याची क्षमता भारतीय लष्कराने प्राप्त केली आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या देशाच्या उत्तर सीमेवर घुसखोरीचे प्रमाण वाढले असले तरी भारतीय सेनेने वारंवार त्यांना रोखले आहे आणि संयमही राखला असल्याचे सांगितले. भारतीय सेनेच्या व्यूहरचना, रणनितीबाबत मत मांडताना ते म्हणाले, आता उत्तर सीमेवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे.

चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आम्ही आमच्या शेजारी देशांशी अधिक सलोख्याचे संबंध निर्माण करत आहोत. आमचे शेजारी देश चीनच्या कुटील नीतीला बळी पडू नयेत, असेच भारतीय सैन्याचे धोरण असेल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय चीनची घुसखोरी रोखण्यासाठीही भारतीय सैन्यदलाची पूर्ण तयारी आहे. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सामरिक धोरणाची परिपूर्ण आखणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादविरोधी मोहिमेचे चांगले परिणाम दिसू लागलेत

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे होत असलेले उल्लंघन, दहशतवाद्यांची घुसखोरी याबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांनी कितीही दहशतवादी पाठवले तरी आम्ही त्यांचा पूर्णपणे निःपात करत आहोत. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिले असता ते स्पष्टपणे दिसून येईल. अमेरिकेने पाकिस्तानची मदत रोखली असली तरीही आपण त्याच्या सकारात्मक परिणामांसाठी काही काळ वाट पाहिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. येथील दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने चालवलेल्या मोहिमेचे काही चांगले परिणामही दिसून येत असल्याचे सांगून ते म्हणाले, पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांचा उपयोग ‘युज अँण्ड थ्रो’ नितीप्रमाणे करत आहे. आणि हे आता काश्मीरी जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे तेथील दंगे, दगडफेक आदी घटना घटल्या असल्याचाही दावा त्यांनी केला

Related posts: