|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा »

 

वृत्तसंस्था/सेंच्युरियन

केपटाऊनमधील पराभवामुळे खडबडून जागे झालेल्या विराटसेनेची आजपासून (शनिवार दि. 13) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यात पुन्हा एकदा अग्निपरीक्षा होईल. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच येथेही जलद, उसळत्या गोलंदाजीला पोषक खेळपट्टी येथे असेल, असे स्पष्ट संकेत असून साहजिकच, भारतीय संघासमोर याचवेळी मालिकेतील अस्तित्व जिवंत ठेवण्याचेही आव्हान असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.

यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना 72 धावांनी जिंकत 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली असल्याने भारताला सर्वप्रथम ही मालिका बरोबरीत आणण्यावर भर देणे क्रमप्राप्त आहे. 2018-19 हंगामात भारत विदेशात थोडेथोडके नव्हे तर तब्बल 12 कसोटी सामने खेळणार आहे. पण, यातील केवळ दुसऱयाच लढतीत पहिली मालिका गमावण्याचे संकट भारतीय संघासमोर उभे ठाकले आहे, ही अर्थातच चिंतेची बाब आहे.

विराटसेनेने मागील हंगामात मायदेशात खेळताना जबरदस्त यश संपादन केले असले तरी केपटाऊनमध्ये वेगवान, उसळत्या गोलंदाजीला सामोरे जाताना त्यांचे पितळ उघडे पडले, ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर, येथील दुसऱया कसोटीत भारतीय संघव्यवस्थापन अंतिम संघात कोणते बदल करणार, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अजिंक्य रहाणे प्रेक्षकाच्या भूमिकेत?

दुसऱया कसोटीतील पहिला चेंडू टाकला जाण्यासाठी 48 तासांचा अवधी असताना, गुरुवारी टीम इंडियाने येथे सुपरस्पोर्ट पार्कवर जोरदार सराव केला होता. जवळपास 4 तास चाललेल्या या सराव शिबिरात चेतेश्वर पुजारा पहिल्या स्लीपमध्ये झेल घेण्याचा सराव करताना दिसून आला तर विराट कोहली, रोहित शर्मा यांनी नेटवर सातत्याने चांगलेच फटके घोटवले. अजिंक्य रहाणे मात्र बऱयाच अंशी जणू एखाद्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून सारे पहात होता. त्याने व शिखर धवनने सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून काही थ्रो-डाऊनवर सराव केला. पण, प्रत्यक्ष जलद गोलंदाजीला ते दोघेही क्वचितच सामोरे गेले.

केएल राहुल, मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी या सत्रात कसून फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली-रोहित शर्मा व पुढे हार्दिक पंडय़ा, वृद्धिमान साहा सरावासाठी दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ येथेही 5 फलंदाजांच्या लाईनअपवर भर देईल, याचे संकेत मिळाले.

धवनऐवजी केएल राहुल शक्य

धवनऐवजी केएल राहुलला संधी मिळणे सध्या साहजिक मानले जाते. धवनने विदेशातील 19 कसोटीत 43.72 ची सरासरी नोंदवली असून त्याच्या कारकिर्दीतील 42.62 सरासरीपेक्षा ही अधिक सरस आहे. त्याने एकूण 29 सामने खेळले आहेत. अर्थात, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका येथील लढतीचा परामर्ष घेतला तर ही सरासरी 11 सामन्यात 27.81 अशी आणखी खाली घसरते, ही वस्तुस्थिती आहे. दक्षिण आफ्रिकेत तर 3 कसोटीत त्याला केवळ 18.00 च्या सरासरीवर समाधान मानावे लागले आहे. 2013-14 च्या दौऱयात 29 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्याची फटक्यांची खराब निवड चिंतेची ठरली असून याचा दाखला केपटाऊनमधील पहिल्या कसोटीतही मिळाला आहे.

त्या तुलनेत केएल राहुल अधिक तंत्रशुद्ध फलंदाज असल्याने त्याला येथे प्राधान्य मिळाल्यास येथे आश्चर्याचे कारण नसेल. रोहित शर्मा की अजिंक्य रहाणे, यावरुन बरेच वादंग झडले असले तरी दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या निवडीचे समर्थन केले होते व यासाठी सध्याच्या फॉर्मचा दाखलाही दिला होता. आता केपटाऊनमध्ये रोहितने 11 व 10 अशा किरकोळ धावांवर समाधान मानले असले तरी केवळ एका लढतीतील अपयशामुळे त्याला बाहेर केले जाणार नाही, असे मानले जाते.

पंडय़ाचा आदर्श घेण्याची गरज

पहिल्या कसोटीत फलंदाजी व गोलंदाज या दोन्ही आघाडय़ांवर दमदार प्रदर्शन साकारणाऱया हार्दिक पंडय़ाकडून येथे भारताला पुन्हा एकदा भरीव अपेक्षा असेलच. पण, आता अन्य सहकारी खेळाडूंनी त्याच्याकडूनच आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पहिल्या कसोटीतील खेळपट्टीचे स्वरुप व एकंदरीत चित्र पाहता, फिरकीपटूला डच्चू दिला जावा का, यावरही चर्चा झडल्याचे कळते. उमेश यादवने शुक्रवारी नेट्समध्ये फलंदाजी व गोलंदाजीचा कसून सराव केला असल्याने येथे त्याला संधी दिली जाणार का, याची उत्सुकता असेल. आजारातून सावरलेला इशांत शर्मा देखील पुरेसा तंदुरुस्त असल्याचे संकेत यावेळी मिळाले. इशांत व उमेश यादव यांनी एकत्रित 115 कसोटी सामने खेळले असून त्यांना संधी द्यायची असेल तर बुमराहला संघातील जागा निश्चितच गमवावी लागेल.

दक्षिण आफ्रिकेचाही कसून सराव

दरम्यान, मालिकेत आघाडीवर असल्याने बऱयाच अंशी निश्ंिचत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी देखील कसून सराव केला आणि आपण मालिकाविजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले. दुखापतग्रस्त डेल स्टेन मालिकेबाहेर पडला असल्याने त्याची जागा कोणी भरुन काढायची, इतकाच त्यांच्यासमोर आता प्रश्न असेल. युवा जलद गोलंदाज लुंगी निग्डीला येथे कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकन संघ येथेही 4 जलद गोलंदाजांनिशी मैदानात उतरेल, हे स्पष्ट आहे. अष्टपैलू ख्रिस मॉरिसलाही संधी मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिका 3 जलद गोलंदाज व एक अष्टपैलू अशा आक्रमक फॉर्म्युल्यावर भर देत आला असल्याने मॉरिसच्या समावेशामुळे ही रणनीती अंमलात आणणे त्यांच्यासाठी अधिक सुलभ असेल.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डीन एल्गार, एडन मॅरक्रम, हाशिम आमला, तेम्बा बवूमा, थेऊनिस डे ब्य्रून, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), केशव महाराज, मॉर्नी मॉर्कल, ख्रिस मॉरिस, व्हरनॉन फिलँडर, कॅगिसो रबाडा, अँदिले फेहलुकवायो, लुंगी निग्डी, डय़ुआन ऑलिव्हिर.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून.

Related posts: