|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गावठाणवाढ संघर्ष समितीचे आजरा तहसीलसमोर धरणे आंदोलन

गावठाणवाढ संघर्ष समितीचे आजरा तहसीलसमोर धरणे आंदोलन 

प्रतिनिधी/ आजरा

गावठाणवाढ झालेल्या गावातील भूखंडांची विक्री लिलाव पद्धतीने होऊ नये, गरजू व्यक्तींनाच भूखंड मिळाले पाहिजेत. तसेच शिल्लक भूखंड लिलावाची प्रक्रिया थांबवावी, लिलावाद्वारे भूखंडांची करण्यात आलेली विक्री रद्द करा आदि मागण्यांसाठी गावठाणवाढ संघर्ष समितीच्यावतीने आजरा तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

सकाळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून माता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्नेहल कांबळे, पूजा कांबळे, छाया कांबळे, सविता कांबळे या भगिनिंच्या हस्ते करून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी कॉ. संग्राम सावंत यांनी गावठाणवाढीतील भूखंड लिलावाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कसे विक्री केले जात आहेत याबाबत माहिती दिली. गोरगरीब व गरजूंना भूखंड प्राधान्याने मिळाले पाहिजेत असे असताना लिलाव प्रक्रियेतून भूखंड विक्री केली जात असल्याने याठिकाणी पुन्हा धनदांडगेच मालक होऊन बसत आहेत. ही चुकीची प्रक्रिया रद्द व्हावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या आंदोलनाला प्रा. सुनील गुरव यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. याशिवाय लालनिशाण पक्ष, मोलकरीण संघटना, सर्व श्रमिक संघ, शिवसेना व मनसेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. दुपारी तहसीलदार अनिता देशमुख यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली. संघर्ष समितीने केलेल्या विविध मागण्यांबाबत वरीष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले असल्याचे सांगण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

गरीब, शोषित, भूमीहीन पात्र व गरजू लोकांची परीपूर्ण वस्तुनिष्ठ यादी तयार करण्यात आली आहे काय, रेखांकनाची ही प्रक्रिया नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून पूर्ण करून घेतली आहे काय, यासाठी जिल्हाधिकाऱयांचा आदेश पारीत केला होता का. रेखांकनाप्रमाणे मोजणी करण्याचे काम, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय व तालुका भूमीअभिलेख कार्यालय यांना करण्याचे आदेश देऊन रेखांकनाप्रमाणे प्रत्येक भूखंडाची मोजणी झाली आहे का यासह विविध प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.

आजरा, गवसे, होन्याळी, हंदेवाडी तसेच कानोली व वेळवट्टी येथील भूखंड विक्रीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करून ही प्रकिया रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तहसीलदा देशमुख यांनी या मागण्यांबाबत वरीष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले. तर देवर्डे येथील गावठाणवाढ आदर्श पद्धतीने केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय साळगांव येथील रस्ता प्रकरणी संबंधितांना तहसीलदारांनी आदेश दिल्याचेही सावंत यांनी सांगितले. यावेळी प्रशासनाच्यावतीने तहसीलदार देशमुख, नायब तहसीलदार कोळी, पोलीस निरिक्षक सुनील पाटील तर आंदोलनकर्त्यांच्यावतीने सावंत यांच्यासह प्रमोद पाटील, रवी भोसले, बबलू शेख, मजिद मुल्ला, मंगेश कांबळे, मारूती सुतार, अर्जुन सुर्यवंशी, गीता पोतदार उपस्थित होते.

Related posts: