|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘लोकमान्य’च्या निरंतर प्रगतीचा आलेख वाढतच राहणार नामदार प्रा. राम शिंदे :

‘लोकमान्य’च्या निरंतर प्रगतीचा आलेख वाढतच राहणार नामदार प्रा. राम शिंदे : 

‘लोकमान्य’च्या सांगली विभागीय कार्यालयाचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी/ सांगली

लोकमान्य टिळक यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी या संस्थेने गेल्या 22 वर्षात निरंतर प्रगती केली आहे. 217 शाखा आणि 3500 कोटीहून अधिक ठेवी तर 2200 कोटीची कर्जे वाटप असा आलेख उंचावला आहे. या प्रवासात मल्टीपर्पज सोसायटी विभागात ही संस्था देशात नंबर वन आहे, तर सहकारी बँकींग क्षेत्रात देशात दहावा क्रमांक आहे. अशा या संस्थेच्या यशाचा प्रगतीचा आलेख असाच वाढत राहणार आहे, असे   प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी (मल्टी स्टेट) बेळगाव या संस्थेच्या सांगली, सोलापूर जिल्हय़ासाठीच्या सांगली विभागीय कार्यालयाचे उदघाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे होते. तर आमदार सुधीर गाडगीळ, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. राम शिंदे म्हणाले, पतसंस्था काढणे आणि त्या चालविणे अतिशय अवघड आहे. पण अशा परिस्थितीत लोकमान्य संस्थेने केलेले काम मोलाचे आहे. अवघ्या 22 वर्षात ही संस्था देशात नंबर वन बनली आहे. या संस्थेविरोधात आजपर्यंत एकही तक्रार नाही. याचाच अर्थ या संस्थेचा कारभार किती पारदर्शक आहे याची खात्री पटते. नागरिक, ग्राहक, ठेवीदार आणि कर्जदार यांच्यात एकप्रकारचे विश्वासाचे नाते संस्थेने निर्माण केले आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबविले. याचवेळी समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये याची दक्षताही घेण्यात येत आहे.

प्रत्यक्षात दोन हजार लोकांना रोजगार देणारी ही संस्था आगामी काळात 50 हजार लोकांना रोजगार देवून अप्रत्यक्षरित्या पाच लाख लोकांचा विकास साधण्याचे काम करणार आहे. ही संस्था दूरदृष्टीने कामकाज करून चार राज्यात चांगला ठसा उमटवत आहे. त्यामुळे या संस्थेच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, तरूण भारतचे प्रमुख किरण ठाकुर यांनी बेळगावाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. हे प्रयत्न करताना मराठी माणसांना रोजगार देण्यासाठी लोकमान्य सारखी संस्था उभा करत प्रत्यक्षात दोन हजार लोकांना त्यांनी रोजागार दिला आहे आगामी काळात तर त्यांचे उद्दिष्ट 50 हजार लोकांना रोजागार देण्याचे आहे त्यांनी सुरू केलेले हे काम अतिशय मोलाचे आहे. बेळगाव प्रश्न सुटला पाहिजे आणि तो सोडविण्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्या बरोबरीने असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. वसंतदादा यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे या वर्षात सरकारने ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जुने बंधारे दुरूस्त करण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी मंत्री शिंदे यांना केले.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, सांगलीत लोकमान्य टिळक 1920 साली येवून गेले त्यानंतर 95 वर्षानंतर लोकमान्य ही संस्था सांगलीत आली आहे. आणि तिच्या माध्यामातून सांगलीकरांना चांगलाच लाभ मिळणार असल्याचे सांगितले.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, किरण ठाकुरांचे मराठी माणसांच्यासाठी सुरू असलेले काम अतिशय मोलाचे आहे. त्यांनी लोकमान्य तसेच तरूण भारत यांच्या माध्यमातून सुरू केलेले काम प्रेरणादायी आहे. अनेक क्षेत्रात ते सध्या काम करत असून समाजातील वंचित घटकांना बळ देण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.

लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले, गेल्या 60 वर्षापासून आमचा सीमाबांधवाचा लढा सुरू आहे. बेळगाव कर्नाटकात अडकले आहे. त्यामुळे बेळगावातील मराठी माणसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या मराठी माणसांना रोजगार देण्यासाठी 1995 साली लोकमान्य संस्थेची स्थापना केली. गेल्या 22 वर्षात या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार देण्यात आला आहे. यामध्ये 75 टक्के महिला काम करतात. त्यामुळे या संस्थेने महिलांना 75 टक्के आरक्षण दिले आहे. 217 शाखा आणि 3500 कोटीच्या ठेवी असणारी ही संस्था चार राज्यात कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून शिपींग, पर्यटन, शिक्षण, अशा अनेक गोष्टी सुरू आहेत.

या संस्थेतून आगामी काळात 50 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे तर त्यामुळे पाच लाख लोकांना त्यांचा अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. या संस्थेकडून आता मुंबई ते गोवा प्रुझर सुरू होत आहे. लवकरच त्यांचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार आहे. सध्या या संस्थेने 30 खेडी दत्तक घेवून कामाला सुरूवात केली असून या खेडय़ातील लोकांचे जीवनमान आणि त्यांची आर्थिक उन्नती करणे हाच उद्देश ठेवून काम सुरू केले आहे. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी मंत्री राम शिंदे यांच्याकडे केले.

यावेळी डॉ. मुकुंदराव पाठक, डॉ. रविकांत पाटील, डॉ. वसंत करमरकर, डॉ. दयानंद नाईक, डॉ. अनिल मडके, चंद्रशेखर केळकर महाराज, मकरंद देशपांडे, जेरेशास्त्री, पांडुरंग खरे, अहमदसाहेब सतारमेकर आणि अभिषेक तेलंग यांचा लोकमान्य संस्थेच्यावतीने मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, शेवंतीलाल शहा, अनिल चौधरी, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, इस्लामपूरचे नगरसेवक विक्रम पाटील, महापालिकेचे नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, संतोष देवळेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, व्यापारी अरूण दांडेकर, नाटय़परिषदेचे मुकुंद पटवर्धन, धनंजय गाडगीळ, बापू गोरे, अभिजीत ताम्हनकर यांची उपस्थिती होती

स्वागत संचालक पंढरी परब यांनी केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. तर संयोजन लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक सुदत्त पाठक, शाखाधिकारी विलास कदम, सुभाष मोरे, श्याम कागलकर, अजित शिरगुप्पे, प्रवीण गांधी, शिंगटे, यांनी केले.

तीन वर्षात 55 टीएमसी पाणी साठविलेः प्रा. राम शिंदे

जलयुक्त अभियानात 14 योजनांचे एकत्रिकरण करण्यात आले. ही योजना तातडीने राबविण्याचे आदेश देण्यात आले. तीन वर्षात या योजनेमधून चार लाख 25 कामे करण्यात आली. त्यातून 55 टीएमसी पाणी वाचविण्यात आले आहे. यामुळे राज्यात दुष्काळी तालुक्यातील चार हजार टँकर कमी झाले आहेत. हे जलयुक्त शिवाराचे यश आहे असे त्यांनी सांगितले.

वसंतदादांच्या कर्मभूमीत काम करण्यास मिळाले हा आनंद : किरण ठाकुर

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राज्याला एक दिशा दिली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती केली. पाणी आडवा पाणी जिरवा हा महामंत्र देशाला दिला अशा या महान नेत्यांच्या कर्मभूमीत लोकमान्य या संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, असे प्रतिपादन लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी सांगितले.

 

 

Related posts: