|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्नाटक सरकारची पाणी वळविण्यासाठी आगळीक

कर्नाटक सरकारची पाणी वळविण्यासाठी आगळीक 

कळसा नाल्याचे बांधकाम सुरूच

प्रतिनिधी/ पणजी

म्हादईचे पाणी चोरटय़ापद्धतीने कर्नाटकात वळविण्यासाठी आगळीक करीत कर्नाटकाने काल शुक्रवारी कणकुंबी येथील कळसा नाल्यावर बांधकाम सुरू केले. मात्र याबाबतची माहिती उपलब्ध होताच जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी याची गंभीर दखल घेत खात्याच्या अधिकाऱयांना कणकुंबी येथे पाठविले. हे प्रकरण सत्य असल्याचे समजताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही याची गंभीर दखल घेत काम बंद करण्यासंदर्भात कर्नाटकाला तात्काळ पत्र पाठविण्याची सूचना राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांना केली. कर्नाटकने चोरटय़ापद्धतीने पाणी वळविण्याचे प्रयत्न केल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने याबाबत काल शुक्रवारी शासकीय पातळीवरही बरीच धावपळ उडाली.

जलस्रोत अधिकाऱयांकडून कणकुंबीत पाहणी 

कर्नाटकने कळसा येथे पाणी वळविण्यासंदर्भात काम सुरू केल्याची माहिती काल सकाळी मंत्री पालयेकर यांना मिळाली. याबाबतची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी तात्काळ खात्याच्या अधिकाऱयांना कणकुंबी येथे पाठविले. कणकुंबी येथील कळसा नाल्यावर प्रमुख नियंत्रण असलेल्या भागात काम सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आले. काम सुरू असल्याची छायाचित्रे यावेळी घेण्यात आली. अधिकाऱयांनी खातरजमा करून याबाबतची माहिती मंत्री पालयेकर यांना दिली.

जलस्रोत मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पालयेकर यांनी याची गंभीर दखल घेत संध्याकाळी उशिरा एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला ऍड. जनरल दत्तप्रसाद लवंदे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन तसेच मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी यांची उपस्थिती होती. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पालयेकर यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली.

पालयेकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर काम सुरू असल्याची छायाचित्रेही दाखविली. तसेच काम सुरू असल्याचा एक व्हिडिओही मुख्यमंत्र्यांना दाखविला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्री पालयेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांना त्वरित महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कर्नाटकाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून त्वरित काम बंद करण्याची सूचना करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानंतर रात्री उशिरा मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

म्हादईबाबत कुठलीही तडजोड नाही

म्हादईच्या पाण्यासंदर्भात राज्य सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी स्पष्ट केले. कर्नाटकने लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे. कोणत्याही प्रकारचे कामकाज केले जाऊ नये, असा आदेश असतानाही कर्नाटकने कळसा येथे बांधकाम सुरू केले. जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांची एक टीम कळसा येथे पाठवून आपण खात्री केली आहे. कर्नाटकाने केलेली आगळीक पत्र पाठवून लवादालाही कळविली जाणार आहे. लवादाच्या कक्षेत राहून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सगळय़ा गोष्टी व्हायला हव्यात. गोव्याच्या हितासंदर्भात आपले सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असेही मंत्री पालयेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुख्य सचिव, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि मंत्री विनोद पालयेकर यांची यासंदर्भात अधिकाऱयांशी चर्चा सुरू होती. सरकारने हा विषय बराच गांभीर्याने घेतला आहे.

Related posts: