|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सम्राट अशोकांच्या मृत्यूसंदर्भात माहितीसाठी शोध समितीची स्थापना करा

सम्राट अशोकांच्या मृत्यूसंदर्भात माहितीसाठी शोध समितीची स्थापना करा 

प्रतिनिधी/    बेळगाव

भारताचा अभिमान असणाऱया सम्राट अशोक यांच्या मृत्यूविषयीचे सत्य संशोधन करण्यासाठी केंद्राने शोध समितीची स्थापना करावी. तसेच कर्नाटकातील कनगनहळ्ळी येथील ‘सन्तती’ या स्थळाला सम्राट अशोकांचे समाधीस्थळ घोषित करावे अशी मागणी आपण केली आहे. अशी माहिती देशभर बुद्ध अवशेष बचाव अभियान राबविणारे व बौद्ध अवशेष बचावचे संघटक भंते तिसावरो यांनी ‘तरुण भारतशी’ बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले की, सम्राट अशोकांवर देशात शेकडोंनी संशोधन केले. तेवढय़ाच पीएचडी करण्यात आल्या मात्र कोणीही त्यांच्या मृत्यू व समाधीबद्दल ठोस सांगू शकले नाहीत, असे देखील त्यांनी सांगितले.

 शोध मोहीम हाती घ्यावी

भंते हे दक्षिण व मध्य भारतात बुद्ध अवशेषाबाबत अभियान राबवत आहेत. सम्राट अशोक यांचे निधन कोठे झाले. याबाबत देशात आजही एकवाक्मयता किंवा स्पष्टता नाही. ज्या राजाने देशाला गौरव ‘मानचिन्ह’ दिले त्याचीच माहिती देशात नसणे हे दुर्दैव आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अनेक जण सम्राट अशोकाचे निधन पाटलीपुत्र अर्थात पाटणा येथे झाल्याचा दावा करतात. मात्र हा दावा फोल असून केंद्र सरकारने त्यांच्या निधनासंदर्भात माहिती घेण्यासाठी शोध मोहीम हाती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

 तसेच पुरातत्व खात्याकडे कनगनहळ्ळी भाग हस्तांतरित करून या भागाला ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे. त्यामुळे सम्राट अशोक सारख्या महान नायकाच्या काळातील कलाकृतींची माहिती सर्वांनाच मिळेल. याबाबत भंते तिसावरो यांनी कर्नाटक सरकारकडे बऱयाचवेळा पत्रव्यवहार देखील केला आहे. बेंगळूर येथील सचिवालयाला भेट दिली आहे. पण हा ऐतिहासिक भाग अजून पुरातत्व खात्याकडे हस्तांतरित केलेला नाही.

दिल्लीत अधिकाऱयांची घेणार भेट

त्याचबरोबर पुरातत्व खात्याच्यावतीने येथे पर्यटकांसाठी कोणतीच सुविधा  करण्यात आलेली नाही. यामुळे कनगनहळ्ळी या गावचा विकास देखील रखडला जात आहे. तरी कर्नाटक सरकारने या ऐतिहासिक ठिकाणाच्या सुविधांबाबत सक्रियता दाखवावी. याबाबत भंत्ते तिसावरो हे आता दिल्ली येथे जाऊन अधिकाऱयांची भेट घेणार आहेत.

सम्राट अशोक भगवान गौतम बुद्धानंतर 150 वर्षांनी आले. सम्राट अशोक नसते तर गौतम बुद्ध कोणाला माहितच झाले नसते. सम्राट अशोकांनी 84 हजार शांती स्तुपांची उभारणी केली आहे. प्रत्येक स्तुपावर त्यांनी विशेष संदेश देखील दिला आहे. त्याचबरोबर ‘चलन’ सुरू करणारे सम्राट अशोकच होते. त्यांचे ‘पाटली पूत्र पासून ते इजिप्तपर्यंत’ वर्चस्व होते. त्यांचा ऱहास कसा झाला हे आजवर अधिकतर जणांना माहिती नाही.

  कनगनहळ्ळी गाव

काही वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्व विभागाने भीमा नदी किनारी उत्खनन करताना यादगिरीजवळील (जिल्हा कलबुर्गी) कनगनहळ्ळी ‘सन्तती’ येथे सम्राट अशोकांच्या काळातील काही शिल्पकलांचे अवशेष सापडले. त्यावर असलेल्या कोरीव कामावर ‘राया अशोक’ तसेच त्यांच्या पत्नीचेही नाव आहे. यावरून तेथे त्यांच्या वंशाचे वास्तव असल्याचे संकेत मिळतात. योगायोगाने कनगनहळ्ळी हे भीमा नदीच्या किनाऱयावर आहे. भीमा नदी महाराष्ट्रातून वाहत कर्नाटकात जाते. महाराष्ट्र ते कनगनहळ्ळी या 300 कि. मी. च्या परिसरात अनेक ठिकाणी बुद्ध अवशेष आहेत.

Related posts: