|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तरप्रदेशात काँग्रेसला ‘बळ’ देणार राहुल गांधी

उत्तरप्रदेशात काँग्रेसला ‘बळ’ देणार राहुल गांधी 

अमेठीचा दौरा : गुजरातमधील कामगिरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

वृत्तसंस्था/ लखनौ 

गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारमोहिमेचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता उत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुढील वर्षी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीकरता राहुल हे सोमवारपासून 2 दिवस अमेठीच्या दौऱयावर असणार आहेत. राहुल यांच्या या लोकसभा मतदारसंघात स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी भाजपने पावले टाकली आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीचा दौरा करत भाजपचे सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच अमेठीत दाखल होणाऱया राहुल गांधींच्या आगमनावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. परंतु उत्तरप्रदेशात काँग्रेसचा मार्ग सोपा नसल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी करणाऱया काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती.

राहुल गांधी राज्याला चांगल्याप्रकारे जाणतात. पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध देखील खूपच चांगले आहेत. त्यांच्यासोबत मैदानात पूर्ण उत्साहाने उतरण्यास आणि कठोर मेहनतीसाठी आम्ही तयार आहोत. लोकसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्ते पक्षाला चांगल्या स्थितीत आणतील असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ यांनी केला.

403 सदस्यीय उत्तरप्रदेश विधानसभेत काँग्रेसला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले. याचबरोबर काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जाणाऱया अमेठी आणि रायबरेलीत देखील पक्षाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. दोन्ही जिल्हय़ांमधील 10 पैकी केवळ 2 ठिकाणीच पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत.