|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चिकोडीच्या ‘तुतारी’ची ललकार देशभरात

चिकोडीच्या ‘तुतारी’ची ललकार देशभरात 

संजय अवघडी/ चिकोडी

 तीन हजार वर्षापूर्वी निर्मिती झालेले ऐतिहासिक तुतारी वाद्य, युद्धसंग्राम, राजेमहाराजांचे आगमन, देवकार्याची सुरुवात अन् पालखी आगमनाची कल्पना या तुतारी वाद्याच्या ललकारीतून दिली जाते. अशा या तुतारी वाद्य निर्मितीचा परंपरागत व्यवसाय चिकोडी झारी गल्लीमधील कलेगार कुटुंबीय करीत आहेत. या व्यवसायात कलेगार कुटुंबाची चौथी पिढी कार्यरत आहे. त्यांनी बनविलेल्या तुतारीचा देशभरात नावलौकीक आहे.

   सदर व्यवसायाबाबत कलेगार म्हणाले, आजोबा अब्दुलकरीम हुसेनसाब कलेगार हे तुतारी बनवत होते. वाद्याच्या निर्मितीसाठी पितळेचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. त्यासाठी कोल्हापूर व पुणे येथून पितळ आणावे लागते. स्वतः कलेगार व कामगार यांच्या मदतीने तीन दिवसात एक ते दोन तुतारीची निर्मिती होते. एका महिन्यात सरासरी 20 नग तयार होतात.

तुतारीस कर्नाटकपेक्षा बाहेरील राज्यातून खूप मागणी आहे. पुणे, मुंबई, पंढरपूर, सांगली, कवठेमहांकाळ, जत, इस्लामपूर, वाळवा, मिरज या  भागातून सर्वाधिक मागणी आहे. पण मागणीएवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पूर्वी वाद्याची होलसेल विक्री प्रति नग 1100 ते 1200 रुपये असलेली किंमत सध्या 2500 रुपयांपर्यंत आहे. तर रिटेल विक्री 3 हजार रुपये प्रतिनग आहे. या वाद्याच्या निर्मितीसाठी लागणाऱया पितळेच्या किंमती वाढल्याने तुतारींच्या किंमतीत वाढ झाली आहे. कर्नाटक राज्यात चिकोडी या एकमेव ठिकाणी याची निर्मिती करण्यात येते. सध्या वाद्यपरंपरांची बदललेली शैली आणि पाश्चिमात्य वाद्यांचा प्रभाव वाढत असला तरी तुतारीचे महत्त्व आजही †िटकून आहे.

तुतारी वाद्य

तुतारी वाद्य विशेष करून कर्नाटक आणि महाराष्मट्रात प्रचलित आहे. साधारणतः 5 ते 6 पितळेच्या नळकांडय़ा एकात एक बसवून तुतारीची निर्मिती केली जाते. याची लांबी अंदाजे 1 मीटर ते 3 फूट लांब असते. या वाद्याला ततुरी, तुरही, तूर्य, बाका अशा अनेक नावानेही ओळखले जाते. पूर्वी लढाईची सुरुवात, राजा-महाराजांचे आगमन अशावेळी तुतारी वाजवली जात होती. देव कार्याची सुरुवात, पालखीचे आगमन, देवतेच्या दर्शनारंभावेळी तुतारी वाजविली जाते. या वाद्याची निर्मिती सुमारे 3 हजार वर्षापूर्वी झाली आहे. तुतारी हे वाद्य लोक संगीतात, ऐतिहासिक नाटकातील वातावरण निर्मिती करण्यासाठी वाजवली जाते. वाद्य तोंडाने हवा फुंकून वाजवायचे असते. त्यामुळे खूप दम लागतो. अशा या ऐतिहासिक वाद्याच्या निर्मितीचे कार्य चिकोडी शहरातील कलेगार कुटुंबीय करत आहेत.