त्या चार न्यायाधीशांना काँग्रेसचे एजंट ठरवले जाईल : शिवसेना

ऑनलाईन टीम / मुंबई :
सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्यानंतर आता शिवसेनेनेही न्यायाधीशांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. गुदमरलेला श्वास मोकळा झाला असे सांगत सेनेने भाजपवरही निशाणा साधला आहे. या चार न्यायमूर्तींना आता काँग्रेसचे एजंटही ठरवले जाईल, असे शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्या. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही ,असे सेगत त्यांनी दीपक मिश्रा यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. या पत्रकार परिषदेने देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेत भूकंपच घडवला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला. चार न्यायमूर्तींनी धाडसी व राष्ट्रहिताचे पाऊल उचलले असून देशाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे. चार न्यायाधीशांनी सत्य मरू दिले नाही व लोकशाही स्वातंत्र्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून आवाज उठवला. आता देशाचा गुदमरलेला श्वास थोडा मोकळा झाला, असे मुखपत्रात म्हटले आहे.