|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अल्पावधीतच प्रगतीपथावर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अल्पावधीतच प्रगतीपथावर 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

काही दिवसांपूर्वी अडचणीत असणाऱया कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अल्पावधीतच परिस्थितीवर मात करून प्रगती साधली आहे. बँकेने सुरू केलेली एटीएम सुविधा शेतकऱयांना लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. कर्जमाफीच्या घोळामुळे शेतकरी अडचणीत आला असून यातून सरकारने तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. अन्यथा आर्थिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असणारा शिरोळ तालुकाही मागे पडेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जयसिंगपूर शाखेच्या एटीएम सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. जिल्हा बँकेचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, विलास गाताडे, अनिल पाटील, निवेदिता माने, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भोला कागले, उदगाव बँकेचे अध्यक्ष महादेव राजमाने, शरद कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, कर्जमाफीसाठी सरकारने शेतकऱयांचे मार्च 2016 पर्यंतचे कर्ज पात्र ठरविले. याद्या तयार झाल्या, मात्र अद्याप शेतकऱयांना कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही. यामुळे थकित रक्कमेवरील व्याज वाढत आहे. जुन्या कर्जाची थकबाकी असल्यामुळे नवे कर्ज मिळत नाही, यामुळे त्रांगडे निर्माण झाले आहे.  कर्जमाफी न झाल्याने आता थकित कर्जावरील व्याज कोण भरायचे, असा प्रश्न सर्वांसमोर उभा असून कर्जमाफीचा घोळ लवकरात लवकर सरकारने संपविण्याची गरज आहे. की नफ्यात सेवा संस्था चालविणे अवघड बनले आहे. सेवा संस्थांना उर्जितावस्था आली तर जिल्हा बँकेची प्रगती होईल. सेवा संस्थांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेअर हाऊस उभारावीत, गावपातळीवर वीज बिल वसुलीचे कामही करावे. 5 कोटीहून अधिक पतपुरवठा करणाऱया सेवा संस्थांना जिल्हा बँकेने एटीएम सुविधा द्यावी, असेही खासदार शेट्टी म्हणाले.

गणपतराव पाटील म्हणाले, जिल्हा बँक अडचणीत असताना बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ व संचालकांनी काटेकोर कारभारातून यावर मात केली. तसेच बँक प्रगतीपथावर आणली. 3500 कोटी इतक्या ठेवी जमविल्या, 2700 कोटीचे कर्ज दिले. एनपीए 5 टक्क्यांवर आणला. जिल्हा बँकेची ही प्रगती कौतुकास्पद आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नात खासदार राजू शेट्टी यांनी अग्रस्थानी राहून मार्ग काढावा. सेवा संस्थांच्या माध्यमातून कोल्ड स्टोअरेजची उभारणी करावी तसेच भाजीपाला निर्यातीसाठी प्रयत्न व्हावेत. यामुळे शेतकरी समृद्ध होईल, तसेच सेवा संस्थांचीही प्रगती होईल. जिल्हा बँकेची एटीएम सुविधा स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

संचालक डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शेतकरी केंद्रबिंदू मानून गेली 80 वर्षे जिल्हा बँक कार्यरत आहे. हरितक्रांतीतून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी बँकेचे नेहमीच प्रयत्न आहेत. कर्जाच्या परतफेडीत शिरोळ तालुका नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. शेतकऱयांसाठी अनेक कल्याणकारी योजना जिल्हा बँकेने राबविल्या. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱया या बँकेने आता जयसिंगपुरात एटीएम सेवा सुरू केली असून येथे पैसे काढण्याबरोबरच पैसे भरण्याचीही सुविधा शेतकऱयांना मिळणार आहे. शिरोळ तालुक्यात कुरूंदवाड, शिरोळ, अब्दूललाट, दत्तवाड येथेही लवकरच एटीएम केंद्र सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  बँकेत 25 लाखापर्यंतचे वैयक्ति कर्ज देण्याची सुविधा असून मार्चंनंतर सभासदांना 12 टक्के लाभांश तसेच कर्मचाऱयांना बोनस देण्यात येईल. सहकारी बँकांनी शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात कर्जपुरवठा केला आहे. कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकऱयांच्या खात्यावर जमा न झाल्याने येत्या मार्च महिन्यात बँका अडचणीत येतील. 100 टक्के रक्कम जमा झाली नाही तर बँकाचा तोटा वाढेल, तसेच एनपीएमध्येही वाढ होईल.

माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, जिल्हा बँक ही शेतकऱयांची शिखर बँक असून शिरोळ तालुक्यातून या बँकेचे चांगल्या पद्धतीने काम होत आहे. महिलांनी या बँकेच्या कर्जसुविधेचा लाभ घेवून लघुउद्योग उभारावेत.

याप्रसंगी सुरेश शहापुरे, प्रा. आण्णासो क्वाणे, पंचायत समिती सदस्या रूपाली मगदूम, मिनाक्षी कुरडे, नगरसेविका अनुराधा आडके, संगिता पाटील-चिंचवाडकर, सुलक्षणा कांबळे, प्रेमला मुरगुंडे, दिपा झेले, नगरसेवक संभाजी मोरे, असलम फरास, राहुल बंडगर, शितल गतारे, शैलेश चौगुले, संजय नांदणे, संजय बोरगावे, दिलीप मगदूम, के. ए. पाटील-चिंचवाडकर, दादासो पाटील-चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, राजेंद्र आडके, रणजिकांत कांबळे, शैलेश आडके, राजू झेले, मुसा डांगे, सुनिल पाटील-मजलेकर, राजेश मालू, शरद इंगळे, बाबासो भोकरे, ताजुद्दीन तहसिलदार, आप्पासो बडबडे, आदिनाथ आरबाळे, शिवराज पाटील, भूपाल विभुते, बाच्यू बंडगर, कुबेर मगदूम, राजू कुरडे, मिलिंद शिंदे यांच्यासह बचत गटाच्या महिला, सेवा सोसायटय़ांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक बँकेचे आयटी विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी बॅकेच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. आभार शिरोळ तालुका विभागीय अधिकारी एम. आर. पाटील यांनी मानले.